नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसर विकसित करण्याबाबत चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जैतादेही शाळेचे नियोजन मनरेगा योजनेच्या माध्यमातून केल्यानंतर शासनाने त्याची दखल घेतली. ‘जैतादेही पॅटर्न’ राज्यातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविण्याबाबत मग्रारोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शासन परिपत्रक काढले आहे.
चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दोन महिन्यांपूर्वी जैतादेही शाळेला भेट देऊन शिक्षक, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून काही बाबी पुढे आल्या. शाळेचा परिसर विकसित करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यातून मार्ग काढत मनरेगा योजनेत २६२ कामांचा समावेश आहे. यातील बरीचशी कामे शाळेच्या, अंगणवाडीच्या परिसरात घेणे शक्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडीला स्वतःजवळून काही खर्च करण्याची आवश्यकता नाही. मनरेगा योजनेच्या निधीवरही कोणती बंधने नाहीत. यात मजुरी आणि साहित्य, असे दोन भाग असतात. सामान्यतः ६० टक्के मजुरीचा भाग आणि ४० टक्के साहित्याचा खर्च, अशी विभागणी असते. यासाठी जी कामे घ्यायची आहेत.
बॉक्स
काय आहे जैतादेही पॅटर्न?
जैतादेही जिल्हा परिषद शाळेत गतवर्षी मुलांना सकस व पोषक आहार मिळावा, याकरिता शाळा परिसरात परसबाग निर्मिती केली गेली. शालेय परिसर बराच मोठा असल्यामुळे विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड करण्यात आली. विद्यार्थी व गावातील नागरिकांसाठी फळझाडे लागवड केली गेली.
बॉक्स
यंदा औषधी वनस्पती
शाळेचे शिक्षक गणेश गंगाराम जामुनकर मुख्याध्यापक, जितेंद्र राठी, सहायक शिक्षक शुभांगी येवले यांनी यावर्षी चिकू, पेरू, बदाम, आवळा, चेरी, लिंबू, करवंद, डाळिंब, अंजीर यासारखी काही फळझाडे लावली. औषधी वनस्पतीसह काही दुर्मीळ वनस्पतीसुद्धा लावण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांच्या घरी परसबाग निर्मिती केली जाणार आहे. परसबागेसाठी काही बियाणे बीडहून, तर अस्सल देशी वाणाचे जवळपास ५० प्रकार धामणगाव रेल्वेहून आणण्यात आली.
बॉक्स
अंगणवाडी केंद्र, झेडपीच्या शाळांमध्ये राबविणार
जैतादेही पॅटर्नच्या धर्तीवर राज्यातील इतर शाळा अंगणवाडी यांचा भौतिक विकास करणे शक्य होणार आहे. त्यासाठी हा पॅटर्न राज्यभर राबविण्यास संदर्भात परिपत्रक मग्रारोहयो प्रधान सचिव नंदकुमार यांनी काढले आहे. या सर्व नियोजनात पालकमंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, मग्रारोहयोचे प्रधान सचिव. नंदकुमार विभागीय आयुक्त पीयूष सिंह मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, गोयल नायक जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. सीईओ अमोल येडगे, प्रकल्प अधिकारी मिताली शेठी, तहसीलदार माया माने, श्याम लंके, बीईओ संदीप बोडके, पीटीओ तुषार लोखंडे, विलास कळमटे आदी सर्वांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले.
कोट
मेळघाट सारखे अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमाची दखल घेऊन शासनस्तरावरून परिपत्रक निघते, ही सर्वांसाठी भूषणावह बाब आहे. पालकमंत्री राज्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केला.
- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, चिखलदरा