लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नांदेड जिल्ह्यातील व्हिलिंटन इंटरनॅशनल स्कूल वाडी येथील शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्यातील कारदा गावातील ८ वर्षीय चिमुकल्याचा २६ जूनला अचानक मृत्यू झाला. श्रावण चंदू कासदेकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो दुसऱ्या इयत्तेत शिकत होता.२६ जूनला शाळा सुरू झाल्यामुळे त्याला नांदेड येथे शाळेत नेण्याकरिता सोमवार, २५ जूनला शाळेतील शिक्षक गोविन्द पवार, राजेश पोल हे शाळेची गाडी घेऊन कारदा येथे आले. पालकांनी श्रावणला आनंदाने गाडीत बसवले. मंगळवारी विद्यार्थी ५०० किमीचा प्रवास करून नांदेडला पोहचले. त्याच दिवशी श्रावणची प्रकृती बिघडल्याने त्याला शाळा व्यवस्थापनाने तेथीलच एका रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. परंतु पालकांना फोनवर न कळविता बुधवारी सकाळी शिक्षक राजेश पोल, गोविंद पवार कारदा येथे पोहोचले. विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असतानासुद्धा पालकांना खोटी माहिती दिली. 'तुमच्या पाल्याची प्रकृती बिघडल्यामुळे तुम्ही नांदेडला आमच्यासोबत चला, असे सांगून घेऊन गेले. तेथे नेल्यानंतर त्यांना त्यांच्या चिमुकल्याचा मृतदेहच दाखविण्यात आला.
नांदेडलाच शवविच्छेदनश्रावणच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नांदेड येथीलच जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या धारणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे मृत श्रावणच्या वडिलांनी सांगितले. गुरुवारी दुपारी श्रावणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे धारणी प्रकल्प अधिकारी गेडाम उपस्थित होते.
श्रावणने आमच्यासोबत लांब प्रवास केला. दरम्यान त्याला उलट्या झाल्या. तो अस्वस्थ झाल्याने लगेच रुग्णालयात भरती केले. परंतु, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.- गोविन्द पवार, अधीक्षक व्हिलिंटन स्कूल, नांदेड
मला शिक्षकांनी खोटी माहिती देऊन शवविच्छेदनासाठी नांदेडला नेले. माझा मुलगा सोमवारी घरून सुस्थितीत गेला होता. त्याला कुठलाही आजार नव्हता. काहीतरी अनुचित घडल्यामुळेच त्याच्या मृत्यू झाला असावा.- चंदू कासदेकर, विद्यार्थी पालक, कारदा