(तीन कॉलम)
अमरावती : थकीत मालमत्ता करावर जानेवारीपासून लावण्यात येत असलेला २ टक्के शास्ती कर माफ करण्याचा मुद्दा सर्व सदस्यांनी लावून धरला. यावर एकरकमी थकीत कराचा १५ मार्चपूर्वी भरणा केल्यास ८० टक्के शास्ती कर माफ करण्याचा ठराव बुधवारच्या आमसभेत घेण्यात आला.
यंदा कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती, यामुळे मालमत्ता कराची थकबाकी वाढत आहे. महापालिकेवरील आर्थिक बोझाही वाढत आहे. त्यामुळे शास्ती करात सवलत देण्याच्या प्रस्तावाला तुषार भारतीय यांनी बुधवारच्या आमसभेत प्राधान्य मागितले होते. त्यानुसार त्यांनी याविषयीची भुमिका मांडली. अनेक महापालिकेत अशाप्रकारची अभय योजना राबविण्यात येत आहे व याविषयीचे अधिकार आयुक्तांना आहे, असे ते म्हणाले. महापालिकेची उत्पन्नवाढ होण्याच्या दृष्टीने शास्ती करात सवलत देण्याची भुमिका चेतन पवार व प्रकाश बनसोेड यांनी मांडली.
महापालिकेची कुठलीही भीती थकबाकीदारांना वाटत नाही. त्यामुळे कालर्मयादा दिल्यास नागरिक पुढे येतील, असे ज्येष्ठ सदस्य विलास इंगोले म्हणाले.
यानंतर महापालिकेद्वारा अशा प्रकारची सवलत व योजना येणार नाही. याविषयी मोठ्या थकबाकीदारांना माहिती करून देण्याविषयी विरोधी पक्षनेते बबलू शेखावत म्हणाले. या चर्चेत प्रशांत वानखडे, अब्दुल नाझीम, संध्या टिकले आदींनी सहभाग घेतला.
बॉक्स
यावर्षी अपवादात्मक स्थितीमुळे निर्णय
कोरोना संसर्गाचे काळात मालमत्ता कराची वसुली माघारली आहे. यावर्षी अपवादात्मक स्थिती लक्षात घेता एकरकमी १५ मार्चपूर्वी भरणा केल्यास ८० टक्के शास्ती कर करमाफ करण्याचे रुलिंग सभापतीं चेतन गावंडे यांनी दिले. याच्या अंमलबजावणीला पाच दिवस लागेल, २५ जानेवारीपासून अंमलबजावणी करण्यात येईल, ऑनलाईन सुविधा युजर फ्रेंडली असेल, असे आयुक्त प्रशांत रोडे म्हणाले. याशिवाय ज्या मार्केटची लिज संपलेली आहे, तेथे नव्या धोरणानुसार लिज धोरण ठरविण्यात येत असल्याचेहे आयुक्त म्हणाले.