जितेंद्र दखणे
अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा परिषदेची सन २०२२ मध्ये पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्याची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या फेऱ्या मिनी मंत्रालयात वाढू लागल्या आहेत. जो तो सदस्य आपल्या गटातील जास्तीत जास्त विकास कामे कशी करता येतील, त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. अनेक सदस्य सकाळपासूनच जि.प.च्या विविध विभागांत तळ ठोकून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुका ५ ते ६ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सन २०२२ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये ५९ गट असून ११८ पंचायत समिती गण आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या सदस्यांची विकास कामांच्या निधीसाठी रचना सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गत दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. कोरोना व योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन असा जिल्हा प्रशासनाने पावले उचलली. विविध विकास कामांवरील निधी शासनाने आरोग्याकडे वळवला. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषद सदस्यांच्या विकासकामांना खीळ बसली आहे. अनेक सदस्यांमध्ये गटामध्ये बोटावर मोजण्याइतकीच कामे करता आली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कामे जिल्हा परिषद गटात व्हावीत, अशी मानसिकता सदस्यांची आहे. मात्र, पुन्हा तिसऱ्या लाटेचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे. त्यामुळे विविध विभागांचा निधी पुन्हा आरोग्याकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या गटात विभागातून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बहुतांश सदस्य दररोज सकाळी विविध कामांची लेटर पॅड घेऊन जिल्हा परिषदेमध्ये हजेरी लावत आहेत.
बांधकाम विभाग, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे, समाज कल्याण, शिक्षण व अन्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सदस्यांची दररोज ऊठबस वाढली आहे. सदस्य अधिकाऱ्यांना काय काय कामे घेता येतात. त्याची माहिती विचारून घेत आहेत. तसेच विविध कामांच्या नावाचे प्रस्ताव संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्याकडे सादर करताहेत.
बॉक्स
पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी
अध्यक्ष उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापती कधीही कामासंदर्भात सदस्यांच्या भेटी होत आहेत. त्यामुळे अनेकांची पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त विकास कामे जिल्हा परिषद गटात होण्यासाठी धडपड सुरू आहे. जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकाही लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विकास कामांना मर्यादा येणार आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांना मंजुरी करून घेण्याची धडपड सुरू आहे.