संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये काँग्रेस व शिवसेनेत काट्याची लढत होती. शिवसेनेचे उमेदवार प्रकाश भारसाकळे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र, मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेस अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि मतदान पाच आठवडे पुढे ढकलले गेले. या काळात काँग्रेसबाबत तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे भारसाकळे ऐनवेळी मागे पडले आणि प्रतिभाताई पाटील यांनी विजय संपादन केला.१९९० मध्ये प्रकाश भारसाकळे प्रथमच दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. जिल्ह्यात शिवसेनेची चांगलीच बांधणी झाली होती. लोकसभा निवडणूक लागली तेव्हा प्रकाश भारसाकळे यांच्या आमदारकीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्यावर विश्वास टाकून लोकसभेची उमेदवारी दिली. प्रचाराला रंग चढला. शिवसेनेने आघाडी घेतली. प्रकाश भारसाकळे खासदार होणार, असे वातावरण तयार झाले. टक्कर काट्याची होईल. यावेळी काँग्रेसने सावध असावे, असे काँग्रेसजनांनाही वाटत होते. मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच २१ मे रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर देशभर दुखवटा पाळला गेला. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा बदलल्या. काँग्रेस पक्षाबद्दल देशभर सहानुभूतीची लाट तयार झाली. प्रचारात शिवसेना मागे पडली. प्रकाश भारसाकळे यांना दुसऱ्या क्रमांकाची १ लाख २१ हजार ७८४ मते मिळाली. प्रतिभाताई पाटील यांना ५५ हजार ४८१ मतांचा लीड मिळाला. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले मावळते खासदार सुदामकाका देशमुख यांनी तिसऱ्या क्रमांकाची ९२ हजार ४८ मते घेतली. या निवडणुकीप्रमाणेच एकूण २४ उमेदवार त्यावेळी रिंगणात होते. राजीव गांधी सुखरूप असते आणि निवडणूक नियोजित तारखांना पार पडली असती, तर शिवसेनेने या मतदारसंघात १९९१ मध्येच पहिला विजय नोंदवला असता, अशी आठवण राजकीय जाणकार आजही सांगतात.प्रतिभा पाटील यांना मेळघाट विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक ४२ हजार ८१६ मते मिळाली, तर प्रकाश भारसाकळे यांना १३ हजार ४७३ मते मिळाली होती. शिवसेनेला साथ करणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातही प्रतिभाताईना आघाडी मिळाली. त्यांनी या मतदारसंघात ३८ हजार ३६२ मते घेतली, भारसाकळे यांना २३ हजार ३७४ मते मिळाली होती. मागील निवडणुकीत सुदामकाका देशमुख यांच्या रूपाने भाकपला गेलेला अमरावतीचा गड प्रतिभाताईनी सर केला.४ लाख २५ हजार झाले होते मतदाननिवडणुकीत एकूण ४ लाख २५ हजार ५०९ मतदान झाले होते. त्यापैकी ४ लाख १८ हजार ८०५ वैध मते होती. या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाचे अमिरखाँ हमीदखाँ यांना १ हजार ४६७, जनता पार्टीचे सुरेंद्र भुयार यांना १ हजार ५८८, तर बसपाचे महादेव कळसकर यांना ४ हजार ५६ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार दिलीप भीमराव वाटाणे यांना ६ हजार १३५ मते मिळाली होती. इतर अपक्ष उमेदवार ‘किस गली मे खसखस’ होते.
आठवणीतील निवडणूक; अन् प्रतिभाताई अमरावतीतून झाल्या खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:14 PM
अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये काँग्रेस व शिवसेनेत काट्याची लढत होती. काँग्रेस अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. या काळात काँग्रेसबाबत तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रतिभाताई पाटील यांनी विजय संपादन केला.
ठळक मुद्देसहानुभूतीची लाट १९९१ च्या निवडणुकीत प्रकाश भारसाकळेंची हुकली संधी