अनास्था : पुतळ्याला हारही नाहीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या बाजूस महापालिका संकुलासमोर उभारण्यात आलेला अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा प्लास्टिकने कापडाने झाकून कायम दुर्लक्षित केले आहे. मात्र, मंगळवारी १८ जुलै रोजी अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनी मातंग समाजातील एकही अनुयायी अभिवादन करावयास फिरकले नाही, हे वास्तव आहे.लोकशाहीर, क्रांतिकारी साहित्यिक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मातंग समाजाच्या भल्यासाठी अख्खे आयुष्य वेचले. गावकुसाबाहेर राहणारा मातंग समाज पुढारावा, शिक्षित व्हावा, यासाठी अण्णाभाऊंनी साहित्य, लेखणीतून समाजप्रबोधनाचे कार्य केले. आजही शासन, प्रशासन स्तरावर मातंग समाजाच्या मागण्या, प्रश्न सोडवायच्या झाल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा, नावांचा वापर करण्यास पुढारी मागे राहत नाही. शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षिततेने काही वर्षांपासून खितपत पडलेला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याबाबत कार्यकर्त्यांनी जाब विचारू नये, ही शोकांतिका आहे. अण्णाभाऊंचा पुतळा दर्शनी भागात उभारण्याची मागणी पुढाऱ्यांच्या दुफळीमुळे मागे पडली आहे. हा पुतळा नेमका कोठे उभारावा? याविषयी पुढाऱ्यांमध्येच एकमत झाले नाही. त्यामुळे तीन ते चार वर्षांपासून अण्णाभाऊंचा पुतळा अस्वच्छता, घाणीच्या विळख्यात उभा आहे. अण्णाभाऊंच्या स्मृतिदिनी पुढारलेल्या म्हणणाऱ्या एकाही कार्यकर्त्यांने प्लास्टिकने झाकून ठेवलेला पुतळ्याची स्वच्छता करू नये, स्मृतिदिनी पुतळ्याला अभिवादन करण्याचे साधे सौजन्यसुद्धा दाखवू नये, यातच समाजाची चळवळ कोणत्या दिशेने चालली, हे स्पष्ट होत आहे.अण्णाभाऊंच्या पुतळा स्थानांतरणसंदर्भात यापूर्वी महापालिका आयुक्तांना भेटले आहे. मातंग समाजावरच अन्याय का केला जातो, याबाबत विचारणा केली. अन्य शहरात एकाच चौकात दोन पुतळे बसविले असताना अमरावतीत राणी दुर्गावती व अण्णाभाऊंचा पुतळा का बसविला जात नाही. १ आॅगस्टपर्यंत तरी अण्णाभाऊंचा पुतळा दर्शनी भागात साकारावा, अशी अपेक्षा.- गंगा अंभारे, नगरसेविका, बडनेरा प्रभाग.
अण्णाभाऊंच्या स्मृतींचा अनुयायांना विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:17 AM