अमरावती : गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरविताना पालकांची दमछाक होत आहे. दिवस निघताच मुलांना हाती मोबाईल हवे, अन्यथा घरात चिडचिड आणि रागावतात. त्यामुळे पालकही चिंतातूर झाले आहे. मुलांच्या सवयी बदलल्याने आरोग्यावर जाणवत आहे.
कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहे. मुलांच्या दिनचर्येत बदल झाला आहे. ८० ते ९० टक्के मुलांचे मैदानी खेळ थांबले आहे. लॅपटॉप अथवा टॅबवर ऑनलाईन शिक्षणाच्या नावे कॉर्टून, सिनेमा बघण्यात मुले मग्न असतात. मुलांना याबाबत मज्जाव केल्यास ते रागावत असल्याच्या तक्रारी अनेक पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नोंदविल्या आहेत. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून दूर जात आहेत.
---------------------
मुलांच्या समस्या...
- शहरी भागात जवळपास सर्व पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल खरेदी केला आहे, मात्र, मुले ऑनलाईन शिक्षणाऐवजी कॉर्टून फिल्म, गेम खेळतात.
- पुस्तकाऐवजी मुलांच्या हाती मोबाईल आल्याने मुलांच्या सवयीत प्रचंड बदल झाला आहे. मानसिक आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आवडी-निवडी पूर्ण करताना पालक त्रस्त झाले आहे.
- मैदानी खेळ बंद झाले. त्याऐवजी मोबाईल टिव्हीने जागा घेतली आहे. शाळा बंद असल्याने मित्र, सवंगडी हरविल्याचे चित्र आहे.
---------------------
पालकांच्या समस्या...
- कोरोना काळात शाळा बंद असल्याने मुले बाहेर पडू नये, यासाठी घरातच टिव्हीसमोर बसून राहण्याची सक्ती केली होती.. आता ही सवय मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मुलांना डोळ्याचे आजार, डोके दुखीचे त्रास वाढले आहे.
- मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. सतत टीव्हीसमोर बसत असल्याने डाेळ्यांचा आजार, मासनिक आरोग्य जडले आहे.
---------------
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
‘‘ ६ ते १६ वयोगटातील मुलांना मानसिक आजाराचे रूग्ण वाढले आहेत. पालक तशा मुलांच्या समस्या घेऊन येत आहेत. हा सर्व प्रकार लहान मुलांच्या सवयी बदलल्याने घडत आहे.
- आशिष साबू, मानसोपचार तज्ज्ञ
---------------
मुलांच्या सवयी आणि चिडचिडपणा वाढल्याच्या तक्रारी घेऊन पालकांची संख्या वाढली आहे. मोबाईल, टिव्हीमुळे मुलांना मानसिक आजार होत असल्याची बाब ही खरी आहे. नियमित सवयी बदलल्याचा हा परिणाम आहे.
- सुजय वानखडे, मानसोपचार तज्ज्ञ