निळे, भगवे फेटे ठरले आकर्षण : महामानवाला आगळे अभिवादन, कर्मचारी, अधिकारी, सदस्यांचा लक्षणीय सहभाग अमरावती : जिल्हा परिषदेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून पहिल्यांदाच शहरातून विविध आकर्षक देखाव्यांसह महारॅली काढून संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.यंदा जिल्हा परिषदेच्यावतीनेसुध्दा विविध जंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने घेतला. त्यानुसार गुरूवारी सकाळी डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष सतीश उईके, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्वर, माजी जि.प.अध्यक्ष सुरेखा ठाकरे, प्रताप अभ्यंकर, सीईओ सुनील पाटील आदींच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून महारॅलीला सुरूवात करण्यात आली. महारॅलीत विविध देखावे समाविष्ट होते. यामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण विभागाने बाबासाहेबांच्या कुटुंबाचा देखावा साकारला, तर समाजकल्याण विभागाने पुणे करार, पशुसंवर्धन विभागाने चवदार तळ्याचा सत्याग्रह, प्राथमिक शिक्षण विभागाने संविधान अर्पण आणि माध्यमिक शिक्षण विभागाने समाज प्रबोधनावर आधारित देखावा साकारून रॅलीचे लक्ष वेधले. यामध्ये ताशे, बॅण्ड पथक, आणि किशोर गवई आणि संचाने बहारदार बुद्ध-भीमगीतांचे सादरीकरण केले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या अभिवादन रॅलीतून सर्वधर्म समतेचा संदेश
By admin | Published: April 15, 2016 12:16 AM