अमरावती : व्याघ्र प्रकल्पाबाहेरील राखीव जंगलात स्थलांतरित वाघांनी क्षेत्र व्यापले आहे. चंद्रपूर येथे वाघांची संख्या ’ओव्हर फ्लो’ झाल्याने ते वाघ आता यवतमाळपर्यंत पोहोचत आहेत. एकूणच विदर्भात वाघांनी स्वत:च कॉरिडोर तयार केल्याचे चित्र आहे. मात्र, व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांची सुरक्षितता धोक्यात आली, हेही तितकेच खरे आहे.
चंद्रपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिरोली या पूर्व विदर्भात वाघांची संख्या अधिक झाली आहे. वाघांना आता बफर झोन, कोअर एरिया कमी पडू लागल्याने त्यांनी सावज शाेधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया भागातील वाघांनी यवतमाळपर्यंत येण्याची मजल गाठली आहे. बुलडाणा येथील ज्ञानगंगा, वाशिम, पांढरकवडा आणि अकोला येथील राखीव जंगलात वाघांचे वास्तव्य आहे. मेळघाटातून वरूड, मोर्शी होत सालबर्डीमार्गे मध्यप्रदेशातील जंगलात वाघांचा संचार वाढला आहे. राखीव जंगलक्षेत्रात वाघ असल्याची नाेंद देखील झाली आहे. मात्र, असंरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांची सुरक्षा कशी करणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. बोर अभयारण्यातून गत दोन वर्षापूर्वी चांदूर रेल्वे, पोहरा-मालखेड जंगलात वाघ आल्याची नाेंद आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, एकट्या विदर्भात ताडोबा-अंधारी, नवेगाव- नागझिरा, मेळघाट, पेंच, बोर असे पाच अभयारण्य आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघ जात असून, राखीव वनात मुक्त संचार करीत आहेत.
------------
गडचिरोलीच्या जंगलात मानव-वन्यजीव संघर्ष नाही
गडचिरोलीच्या जंगलातही वाघ आहेत. मात्र, जंगलात नक्षलवाद्यांची भीती असल्याने येथे वाघांची शिकार करण्यात कुणी धजावत नाही. गडचिरोलीच्या जंगलात नेमके किती वाघ आहे, हे वन विभाग किंवा वन्यजीव विभाग ठामपणे सांगू शकत नाही. परंतु, येथे मानव-वन्यजीव संघर्ष होत नाही.
-------------
वाघ हा सावज अथवा जाेडीदार शोधण्यासाठी मुक्त संचार करणारा प्राणी आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेरील सीमा ओलांडून स्थलांतरित होतात आणि कालांतराने परतही येतात. हा त्यांचा नियमित शिरस्ता आहे. राखीव जंगलात आढळून येणाऱ्या वाघांवर नजर ठेवण्याच्या सूचना वनाधिकाऱ्यांना पूर्वीच दिल्या आहेत.