लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सुमारे ३०० फूट खुल्या जागेच्या वादातून एका शेजाऱ्याने चक्क शेजारील मायलेकावर सब्बलने हल्ला चढवत त्यांना ठार केले. सोमवारी दुपारी ४ च्या आसपास मंगलधाम कॉलनीनजीकच्या - बालाजीनगर येथे ती डबल मर्डरची हृद्यद्रावक घटना घडली. सूरज विजयराव देशमुख (३२) व कुंदा विजयराव देशमुख (६५) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत. त्यात विजयराव देशमुख (७०) हे जखमी झाले. देवानंद लोणारे (४५, रा. बालाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे. मायलेकाचा खून करून तो घराला कुलूप लावत पसार झाला. त्याला रात्री नऊच्या सुमारास माहुली चोर येथील शिवारातून ताब्यात घेण्यात आले.
विजयराव देशमुख व देवानंद लोणारे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यांच्या दोन घरांच्या मध्ये सुमारे ३०० फूट खुली जागा आहे. त्या लांब व खुल्या पट्टीवजा प्लॉटच्या मागील बाजूस घर बांधले गेल्याने देशमुख व लोणारेंमध्ये त्या जागेच्या कब्ज्यावरून वाद सुरू झाला. लोणारेने अर्ध्यापेक्षा अधिक जागेवर कुंपण टाकले. त्यात झाडे लावली. त्यामुळे तो वाद अधिकच वाढला.
दरम्यान, सोमवारी दुपारी त्याच कारणावरून देवानंद लोणारे हा देशमुख यांच्या घरात शिरला. येथील एका मसाला कारखान्यात काम करणाऱ्या सूरज देशमुखशी त्याने वाद घातला. बोलचाल ऐकून सूरजची आई कुंदाबाई घराबाहेर आल्या. त्या मध्यस्थी करत असतानाच आरोपी देवानंदने त्या मायलेकांवर सब्बलने हल्ला केला. त्यात त्या मायलेकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाचवा, धावा असा आवाज ऐकून विजयराव घराबाहेर आले. त्यांच्यावर देखील त्याने सब्बलचा वार केला. मात्र, काही शेजाऱ्यांनी धाव घेत त्यांचा जीव वाचविला. आरोपी अन्य शेजाऱ्यांच्या मागे देखील सब्बल घेऊन धावला. घटनेवेळी सूरजचा मोठा भाऊ खासगी नोकरीला गेला होता.
आरोपी यवतमाळच्या दिशेने, पोलिस होते मागावर• आरोपी देवानंद लोणारे (४५) हा शेजारील मायलेकाचा निघृण खून करत घराला कुलूप लावत पळून गेला, पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्याचे घराच्या प्रवेशद्वाराला कुलूप आढळले. पोलिसांनी प्रवेशद्वारावरून आत चढत आरोपीने घरात सोडलेला सब्बल जप्त केला. तो यवतमाळच्या दिशेने पळाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. तो इंटरनेटचे, टीव्ही कनेक्शनचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेवेळी त्याची पत्नी व मुले घरी होते की कसे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.