तिवसा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीनजीक एका शेतात बऱ्याच दिवसांपासून मोठा जुगार सुरू होता. त्यावर रविवारी रात्री वाजता पोलिसांनी धाड टाकली. तिघांना अटक करून आठ हजार रुपये जप्त केले. तीन आरोपी पसार झाले. मात्र, घटनास्थळी २० ते २२ जण जुगारात सहभागी होते आणि लाखो रुपयांचा खेळ सुरू होता, अशी माहिती पुढे आली आहे. या घटनेच्या अनुषंगाने लाखोंचा जुगार दाखवला हजारात दाखविल्याचे क्क्या सुरात बोलले जाते आहे.
बाळू डवरे (रा. माळेगाव), सज्वल दहापुते व अन्य एका गुरुदेवनगर येथील युवकाला अटक करून त्यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यात पाच दुचाकी, चार मोबाईल फोन व ८१०० रुपये रोख असा ३ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा एकूण असा मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती आहे. या ठिकाणी जुगार खेळणारे सर्वच आरोपी हे अवैध व्यावसायिक होते, अशी माहिती आहे.
गुरुकुंज मोझरीच्या दास टेकडीजवळ बऱ्याच दिवसांपासून जुगाराचा अड्डा आहे. येथे राखी पौर्णिमेपासून खऱ्या अर्थाने जुगाराला सुरुवात होते. जिल्ह्यातून जुगारी जुगार खेळण्यासाठी येतात, हे जगजाहीर आहे. पोलिसांनी या जुगारावर छापा टाकताच काही पत्रकार दाखल झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
---------------
गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. रात्रीचा वेळ व अंधार असल्याने आरोपी घटनास्थळाहून दुचाकीवरून पसार झाले. पसार आरोपींचा शोध घेण्यात येईल.
- रीता उईके, पोलीस निरीक्षक, तिवसा