मोर्शी : तीन अज्ञात आरोपींनी एका मिनीट्रकचालकाला मारझोड करुन मालासह मिनीट्रक घेऊन पळ काढला. मंगळवारी रात्री ११ वाजता ही घटना मोर्शी ते वरुड मार्गावरील माडू नदीशेजारी घडली. अचलपूर येथील खडसे हे राज्य वीज वितरण कंपनीला लागणाऱ्या अॅल्युमिनियम वायर वाहतुकीचे कंत्राटदार आहेत. त्यांच्याकडे मालवाहून वाहन क्र.एम.एच.-२७ एक्स ६३६ या ट्रकवर अचलपूर येथीलच अशोक बाजीराव तळोकार हा वाहनचालक आहे. बुधवारी वाहन चालकाने गडचांदूर येथे काही माल वितरित केला. त्यानंतर भंडारा येथून त्याने या ट्रकमध्ये ३० बंडल अॅल्युमिनियम तार घेतले आणि तो काटोल-वरुड मार्गाने अचलपूर येथे परत जात होता. रात्रीच्या सव्वाअकरा वाजताच्या सुमारास मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या माडू नदीच्या पुलाशेजारी अज्ञात तिघांनी हात दाखवून चालकाला ट्रक थांबविण्यास भाग पाडले. या तिघांनी चालक अशोक तळोकार याला वाहनातून बाहेर खेचले. त्याचे हात दुपट्ट्याने बांधून बाजूच्या झुडुुपात त्याला लोटून दिले आणि वाहन वरुड मार्गाने तार बंडल आणि चालकाच्या भ्रमणदूरध्वनीसह पळवून नेले. वाहन पळवून नेल्यावर काही वेळाने चालकाने स्वत:चे बांधलेले हात सोडवून घेतले आणि मोर्शी गाठले. दूरध्वनीवरुन त्याने कंत्राटदार खडसे यांना घटनेची माहिती दिली. कंत्राटदाराच्या निर्देशाप्रमाणे चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार नीलिमा आरज यांनी भादंवीच्या कलम ३९२ प्रमाणे गुन्हे दाखल केले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. तक्रार नोंदविल्यानंतर रात्रीपासूनच वाहन चालकाला सोबत घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शीतल मालटे आणि त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांनी थेट काटोलपर्यंतचा मार्ग पिंजून काढला. आरोपींना अटक करण्यात यश प्राप्त झाले नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली असली तरी या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणातील तथ्य शोधून काढण्याचा चंग बांधला असून ठाणेदार नीलिमा आरज तपास करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
मारहाण करून मिनीट्रक पळविला
By admin | Published: April 24, 2015 12:16 AM