अमरावती : अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी पोलिसांनी 'कोंबिंग ऑपरेशन' सुरू केलं आहे. या घटनेप्रकरणी आतापर्यंत ११ हजार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच माजी मंत्री व भाजप नेते अनिल बोंडे, भाजपचे आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, मनपा गटनेता मनोज भारतीय यांना पोलिसांनी अटक केली.
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, रबरी बुलेटचा वापर केला. शनिवारी दुपारी ३ नंतर टांगापाडाव चाैकापुढे सक्करसाथ, चांदणीचौक भागात धुमश्चक्री उडाली. दोन तास थरार चालला. परिणामी, संचारबंदीपाठोपाठ इंटरनेट बंदी करण्यात आली. तर रविवारी पेट्रोलबंदी करण्यात आली. सलग दोन दिवस शहरात हिंसक घटना घडल्यामुळे अमरावतीकर दहशतीत आले. दरम्यान, रविवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती.
शहरातील विशिष्ट परिसर रविवारी देखील धुमसत राहिला. रविवारी पहाटेपर्यंत शहरातील काही भागांत धरपकड मोहीम सुरुच होती. शहर कोतवाली पोलिसांनी त्याप्रकरणी दोन्ही गटांतील जमावाविरुद्ध जाळपोळ, दगडफेकप्रकरणी गुन्हे दाखल केले.