आयटीआयमध्ये झाडाझडती : रोजगार मेळाव्याच्या आयोजनावर प्रचंड नाराजीगणेश वासनिक अमरावतीतुतारीचे स्वर कानी पडताच राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे प्रचंड संतापले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात मंत्र्याच्या स्वागतासाठी शिक्षकांनी केलेला तामझाम बघून ते चांगलेच भडकले. एकिकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देवून रोजगार मिळवून देण्याऐवजी शिक्षक केवळ नौटंकी करण्यावर भर देत असल्याचे ना. पाटील खंत व्यक्त करताना म्हणाले. शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यासाठी ना. पाटील हे येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात सोमवारी दाखल झाले. मात्र या कार्यालयाने मंत्रीमहोदय येणार असल्यामुळे परिसर रांगोळ्यांनी सज्ज केला होता. जागोजागी फुलांचा वर्षाव, फुलांच्या रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. ना. पाटील हे मुख्य कार्यक्रम स्थळी पोहचताच औक्षवण आणि तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. हा सर्व तामझाम बघून ना. पाटील प्रचंड संतापले. ‘मी येथे तुतारी ऐकायला आलो नाही, हे केले कोणी?’ असे त्यांनी विचारले. मात्र स्वागतासाठी तुतारी वाजविल्याने ना. पाटील संतापल्याचे दिसून येताच उपस्थित शिक्षकवृंद दबक्या पावलांनी मागे सरकले. तर दोन्ही तुतारी वादकांनी स्वर बंद करुन तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर रोजगार मेळाव्याबाबत आढावा घेताना ना. पाटील यांनी विभागातील शेतकऱ्यांची परिस्थिती शिक्षकांसमोर ठेवली. शासन प्रशिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करीत असताना रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांची संख्या ही ३० ते ३५ राहणार असेल तर भविष्यात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाविषयी नक्कीच विचार करावा लागेल, अशी तंबी दिली. बेरोजगारांना रोजगार मिळावा, अशी शिक्षण प्रणाली शासनाला अपेक्षित आहे. मात्र कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षकांनो नोकरी करीत असताना दायीत्व असल्याबाबत विसर पडू देवू नका. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगारभिमुख शिक्षण मिळावे, गुणवत्तेवर आधारीत शिक्षण देण्यासाठी कष्टा करा, असा सल्ला त्यांनी दिला. परंतु मंत्र्यांच्या स्वागतासाठी तुतारी कशाला? शासनाच्या पैशाची होत असलेली उधळपट्टी बघून मन खिन्न झाल्याचे ना. पाटीेल यांनी जाहिरपणे बोलून मनातील शल्य व्यक्त केले. यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचे शेकपुरे, देवतळे, देशपांडे आदी उपस्थित होते.
तुतारी वाजताच गृहराज्यमंत्री संतापले
By admin | Published: January 19, 2016 12:14 AM