रिपाइंची मागणी : विश्रामभवनात पालकमंत्र्यांना निवेदनअमरावती : येथील राज्य राखीव दलाच्या वसाहतीमागील वडाळी वनविभागाच्या टेकडीवर असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी गुरुवारी रात्री काही समाज कंटकांनी भंते संघपाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्लाचा रिपाइं (गवई गट) ने निषेध केला.हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले यांना साकडे घालण्यात आले. भंते संघपाल यांच्यावर हल्ला कोणी केला, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही, हे विशेष. रिपाइंचे नेते राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात शुक्रवारी येथील शासकीय विश्रामभवनात सामाजिक न्याय मनत्री बडोले, पालकमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन सादर करण्यात आले. वडाळी वनविभागाच्या टेकडीवर केवळ बुद्ध विहाराचे अतिक्रमण नसून अन्य समाजाने देखील अतिक्रमण केले आहे. मात्र वनविभाग याच बुद्ध विहाराला अतिक्रमणाचा ठपका ठेवला जात असल्याचा आरोप राजेंद्र गवई यांनी केला. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांना निवेदन देताना भंते संघपाल यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढले नाही तर कायदा सुव्यवस्था हाती घेऊ, असा इशारा रिपाइंने दिला आहे. भंते संघपाल यांच्यावर जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात उपाचार सुरु आहे. यावेळी राजेंद्र गवई, नगरसेवक भूषण बनसोड, अमोल काळे, सविता भटकर, हिंमत ढोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गत महिन्यात वन विभागाची चमू या अतिक्रमीत जागेवर जावून आली होती. अतिक्रमण विभागाने धार्मिक स्थळ हटविण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र ते अद्यापही हटविण्यात आले नाही, अशी माहीती आहे. (प्रतिनिधी)
भंते संघपालांच्या हल्लेखोरांना अटकेसाठी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांना साकडे
By admin | Published: January 02, 2016 8:29 AM