अचलपूर : अचलपूर नगरपालिकेने बांधलेली घरकुले धूळखात, नागरिकांची घरासाठी भटकंती या मथळ्याखाली लोकमतध्ये वृत्त प्रकाशित होताच अचलपूर नगर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले व संबंधित घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली. त्याचप्रमाणे या वृत्ताची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेऊन अचलपूर पालिकेची कान उघाडणी केली.
अचलपूर नगरपालिकेच्यावतीने रस्ता रुंदीकरणादरम्यान विस्थापित झालेल्या कुटुंबीयांसाठी १६ लाख रुपये खर्च करुन सन २०१२-२०१३ साली चार घरकुले बांधण्यात आली होेती. मागील ७ वर्षांपासून ही घरकुले कुलूपबंद स्थितीत धूळखात पडलेली आहे. एकीकडे गोरगरीब, विधवा, निराधार, अपंग नागरिकांना घरकुलासाठी वणवण भटकावे लागत असून, चार घरकुले धूळखात पडली आहे.
काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष अरुण वानखडे यांच्या कार्यकाळात टक्कर चौक ते खिडकी गेट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. तेव्हा रस्ता रुंदीकरणात ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांना घरकुले बांधून देण्यात येणार होती. अशा चार कुटुंबियांकरिता झेंडा चौक भागात लाखो रुपये खर्च करून तातडीने चार प्रशस्त घरकुलाचे बांधकाम करण्यात आले. रस्ता रुंदीकरणाचे काम बंद झाले मात्र ही घरकुले तशीच धुळखात पडली आहे. याबाबात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर पालिकेला जाब विचारला असता स्पष्टीकरण दिले की, नगर परिषद अचलपूर न.प. निधी अंतर्गत अचलपूर शहर झेंडा चौक जवळ रहवासींच्या पुर्नवसनकरीता घरकुल बांधकाम आले. न.प.अचलपूर शहर येथील झेंडा चौकजवळ रहिवाशांच्या पुनर्वसनकरिता ४ घरकुल २०१२-१३ मध्ये बांधण्यात आले आहे. सदर घरकुलचे नियोजन अचलपूर शहर खिडकी गेटचे रस्त्याचे रुंदीकरणामुळे बाधीत होणाऱ्या रहिवासांच्या पुनर्वसनकरिता करण्यात आले. रस्त्याचे रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या काही कुटुंब रस्त्याला लागून राहत होते. त्यामुळे २०१२-१३ मध्ये न.प.निधी अंतर्गत निविदा करून कंत्राटदार अ.रफीक अ. गफ्फर यांची नियुक्ती करून घरकुलचे बांधकाम करण्यात आले. बाधित कुटुंब जुन्याच जागी राहत आहे. त्यामुळे न.प.अंतर्गत बांधण्यात आलेले ४ घरकुलांची किंमत १६ लक्ष रुपये असून कंत्राटदाराला त्यावेळी देयक अदा करण्यात आली नाही. त्यामुळे सदर घरकुल पुनर्वसनाकरिता रस्ता रुंद करताना सदर कुटूुंबांना घरकुल देण्याबाबत सभेपुढे विषय ठेवून निर्णय घेता येईल व रस्त्याचे रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना नियमानुसार घरकुल पट्टे प्राप्त झाल्यावर घरकुलाचे लाभ देणे योग्य राहील, अशी माहिती देण्यात आली. न.प.प्रशासन लवकरच सभेत ठराव घेऊन लाभार्थ्यांना घरकुल देण्यात येणार आहे.
कोट
घरकुलाचा प्रश्न गरीब जनतेशी निगडित असल्याने तो न.प.च्या आम सभेत उपस्थित करेन. विस्थापिंना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करण्याकरिता प्रशासनाला पत्र दिलेले आहे.
- बंटी ककरानीया, प्रहार नगरसेवक