प्रदीप भाकरे
अमरावती : विनापरवाना सुसाट गाड्या पळवणाऱ्या अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांमुळे शहरातील रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. जानेवारी ते जुलै अशा सात महिन्यात केवळ २८ अल्पवयीनांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांवर शेकडो अल्पवयीन बाईक वा मोपेड बेदरकारपणे पळविताना दिसून येतात. शाळा कॉलेजेस सुरू नसल्याने कारवाईचा वेग मंदावला आहे.
शहरतील वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्यांचा श्वास गुदमरला आहे. वाहनांच्या वाढलेल्या कोंडीत अल्पवयीन मुले, मुली आणि विद्यार्थी कोणत्याही परिणामाची पर्वा न करता भरधाव वाहने घुसवितात. यामुळे केवळ पायी चालणारेच नव्हे, तर रस्त्यावरील दुसऱ्या वाहनचालकांच्या जीवालासुद्धा धोका आहे. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या लक्षणीय आहे. शिकवणीला जाताना वाहनांवर वेगवेगळे स्टंट करण्याचे प्रकारही शहरात दृष्टीस पडतात.
//////////
पालकांचीही जबाबदारी
बहुतांश विद्यार्थी शिकवणीला येताना दुचाकींचा वापर करतात. रहिवासी वस्तीतून भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. ज्या कोचिंग क्लासमध्ये दहावीपर्यंत शिकवणी घेतली जाते, ती मुले अधिकाधिक १६ वर्षांची. मात्र, तेथील पार्किंग दुचाकीने भरलेली असते. नववी दहावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांकडे आजमितीस वाहने आहेत. अजाणत्या वयात पाल्यांना दुचाकी देऊ नये, ही पालकांचीही जबाबदारी आहे. अल्पवयीनांनी वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्याच्या ४/१८१ नुसार दंडात्मक कारवाई केली जाते.
///////////////
विद्याथीही सुसाट
अल्पवयीन वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी असतात. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसतो. ही मुले वेगाने गाडी चालवत असल्यामुळे अपघातसुद्धा होतात. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीमध्येही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्या वेळी पोलिस व परिवहन विभागाने याबाबत जागृती करावी व त्यानंतरही असे प्रकार दिसल्यास संबंधित अल्पवयीन वाहनचालकांच्या पालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप सुरू करण्यात आली नाही.
///////////////
अशी झाली अल्पवयींनावर कारवाई
जानेवारी : १
फेब्रुवारी : १
मार्च : २
एप्रिल : ३
मे : १
जून १२
जुलै : १६
//////////////////////////
कोट
अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नये, यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यात येईल. शाळा, महाविद्यालय तथा शिकवणी वर्ग संचालकांनीदेखील अल्पवयीनांच्या दुचाकींना नो एन्ट्री केली पाहिजे.
- विक्रम साळी, पोलीस उपायुक्त