लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी नियमांना तिलांजली देऊन तालुक्यात गौण खनिज खणन व वाहतूक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कुठल्याही किमतीला पूर्ण करण्यास शासनाने सर्व नियमांना तिलांजली आणि कंत्राटदाराला सूट तर दिली नाही ना, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.तालुक्यातील टिटवा, किरजवळा परिसरात गतीने कामास सुरुवात झाली आहे. सदर महामार्ग जमिनीपासून उंचावर असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात मुरुमाची आवश्यकता भासत असल्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे शेत केवळ मुरूम उत्खननाकरिता खरेदी करण्यात आले आहे. चांदूर रेल्वे तहसील कार्यालयाद्वारे काही नियम व शर्तींच्या अधीन राहून उत्खनन परवानगी दिली आहे. परंतु, या नियमांचे उल्लंघन या कंत्राटदाराकडून होत असल्याचे निदर्शनात आले आहे. नियम ५९ व ६० अन्वये देण्यात आलेल्या तात्पुरता परवाना अंतर्गत खड्ड्याची खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसावी, असा नियम आहे. परंतु, टिटवा परिसरात सहा मीटरपेक्षाही जास्त खोलीचे खणन करण्यात आल्याचे समजते. या परिसरात खोलवर खणताना चक्क जमिनीला पाणी लागले आहे.परवानाधारकाने परवाना क्षेत्रातून नेलेल्या गौण खनिजाची सुरक्षित वाहतूक करणे बंधनकारक आहे. ते सांडू नये किंवा धूळ उडू नये, यासाठी ताडपत्रीने किंवा योग्य अशा इतर साधनाने झाकून गौण खनिजाची वाहतूक केली जावी व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहित केलेल्या मर्यादेत ध्वनिप्रदूषण राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असासुद्धा नियम आहे. परंतु, खुल्या, ओव्हरलोड गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे. या मालवाहू वाहनाला जीपीएस ट्रॅकिंग सुविधा आहे की नाही, याबाबत माहिती मिळू शकली नाही. हे ट्रक कोणाच्याही शेतातून जातात. याशिवाय या गौण खनिज वाहतुकीमुळे निमगव्हाण-शेंदूरजना रस्त्याची अक्षरश: वाट लागली आहे.
टिटवा परिसरात गौणखनिजाचे नियमबाह्य खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 1:37 AM
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी नियमांना तिलांजली देऊन तालुक्यात गौण खनिज खणन व वाहतूक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कुठल्याही किमतीला पूर्ण करण्यास शासनाने सर्व नियमांना तिलांजली आणि कंत्राटदाराला सूट तर दिली नाही ना, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
ठळक मुद्देसमृद्धी महामार्गासाठी ‘सबकुछ’ : अवैध उत्खनन, वाहतूक