प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चोरी-दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान एक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १३ दिवसांत सात अल्पवयीन मुली व एका १४ वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. चौघा विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. सहा विनयभंगाच्या घटना नोंदविण्यात आल्या तसेच दोन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला. अर्थात १३ दिवसांमध्ये २० अल्पवयीन मुली, महिला अत्याचाराच्या बळी पडल्या.विशेष म्हणजे, या अपहरणांमध्ये परिचित किंवा परिसरातील तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अल्पवयीन शाळकरी मुले आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत जिल्ह्यामध्ये अलीकडे वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.अल्पवयीन मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्यास त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार, पोलीस भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदवितात. तपासाअंती त्यातील काही मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे निष्पन्न होते. अशा प्रसंगी कुटुंब तडजोडीकडे वळत असल्याचा अनुभव आहे.चार विवाहितांचा शारीरिक छळमाहेरहून हुंडा आणण्यासाठी, तो आणला नाही म्हणून, मूल होत नसल्याने विवाहितांचा छळ केला जातो. ऑक्टोबरच्या पहिल्या १३ दिवसांत अशा चार प्रकरणांमध्ये विवाहितेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेंदूरजनाघाट, येवदा, अंजनगाव सुर्जी व सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.येथून पळविले अल्पवयीन मुलींनाअंजनगाव सुर्जी शहरातील शहापुरा येथून एका १४ वर्षीय मुलाला पळवून नेण्यात आले. दर्यापुरातील सांगळूदकरनगर, शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अडगाव येथून एका अल्पवयीन मुलीला, तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील १५ वर्षीय मुलीला, तळेगाव दशासर हद्दीतील सुलतानपूर येथील १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीला, मंगरुळ दस्तगिर हद्दीतील १३ वर्षीय मुलीला व तळेगाव दशासर पंचक्रोशीतील एका १६ वर्षीय मुलीला तर मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय मुलीला पळविले. या सर्व घटनांची तक्रार १ ते १३ आॅक्टोबर दरम्यान नोंदविण्यात आल्या. यापैकी केवळ एक मुलगी घरी परतली.बदनामीमुळे माघारमुलगी अचानक घरातून गायब झाल्याने घाबरलेले पालक पोलिसांत तक्रार करतात. अल्पवयीन असल्याने पोलीसही गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करतात. मात्र, आरोपी पकडल्यानंतर प्रेमप्रकरण समोर येते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्रास व बदनामीच्या भीतीने अशा प्रकरणांत अनेकदा पालकांकडूनच माघार घेतली जाते. काही वेळेला त्याचा बागुलबुवा करूनही प्रकरण मागे घेण्यास भाग पाडले जाते.