लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गणेश दुग्धप्राशन अर्थात गणपतीची मूर्ती दूध पाजण्याच्या चमत्काराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पदार्फाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडीओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये कोंबडीला संमोहित करण्याचा चाकणचे कार्यकर्ता अतुल सवाखंडे यांचा प्रयोग अव्वल ठरला. अंनिस कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांच्या गटात प्रश्नचिन्हाची करामत गुरुत्व मध्याच्या साह्याने हा आनंदी जाधव (रा. नाशिक) या चौथीच्या विद्यर्थिनीने प्रथम क्रमाक पटकावला.
स्पधेर्साठी कार्यकर्ता, कार्यकर्त्यांचे कुटुंबीय आणि खुला, असे तीन गट करण्यात आले होते. कार्यकर्त्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनीही या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला. विशेषत: शाळकरी मुलींचा उत्साह यामध्ये आढळला. अशा प्रकारच्या या पहिल्याच स्पधेर्साठी एकूण ९० व्हिडीओ राज्याच्या कानाकोपºयातून अंनिसला प्राप्त झाले. ऑनलाईन चमत्कार सादरीकरण राज्यस्तरीय स्पर्धा २०२० मध्ये कार्यकर्ता कुटुंबीय गटात द्वितीय क्रमांक आठवीचा विद्यार्थी अमूर चैताली शिंदे (रा. ठाणे) याच्या पेटता कापूर खाणे या प्रयोगाला, तर तृतीय क्रमांक तन्वी सुषमा परेश (रा. धुळे) हिच्या काळी बाहुली नाचविणे - भूताचा खेळ संपविणे या प्रयोगाला मिळाला. सई भोसले (रा. सोलापूर) हिच्या मंत्राने अग्नी पेटविणे व विश्वा शेलार (रा. भिवंडी) हिच्या रिकाम्या हातातून नोटा काढणे या प्रयोगांना उत्तेजनार्थ क्रमांक लाभले.
अंनिस कार्यकर्ता गटात द्वितीय क्रमांक चंद्रकांत शिंदे (रा. सांगली) यांच्या साखळीत रिंग अडकवून बाहेर काढणे या प्रयोगाने, तर तृतीय क्रमांक भास्कर सदाकळे (रा. तासगाव) यांच्या रिकाम्या हातातून कुंकू काढणे या प्रयोगाने पटकावला. किशोर पाटील (रा. टिटवाळा) यांच्या कमंडलूमधून गंगा काढणे, दत्ता बोंबे (रा. कल्याण) यांच्या अतींद्रिय शक्तीने क्रूस उभा करणे आणि आशा धनाले (रा. मीरज) यांच्या पंचगव्याची पॉवर या प्रयोगांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. खुल्या गटातून तेजस्विनी योगेश (रा. नाशिक) यांच्या हळदीचे कुंकू करणे व धनराज रघुनाथ (रा. चंद्रपूर) यांच्या काड्यापेटीच्या काड्यांची निर्मिती या प्रयोगांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.
स्पधेर्चे परीक्षण चित्रपट परीक्षक अनमोल कोढाडिया आणि कोल्हापूर व अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी केले. निकालाची घोषणा अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी केली. स्पधेर्चे संयोजन अंनिसचे राज्य सरचिटणीस नितीनकुमार राऊत, सुरेखा भापकर, ठकसेन गोराणे, श्रेयस भारूले, अवधूत कांबळे यांनी केले.