लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काही विशिष्ट राजकीय व्यक्ती आणि पक्षाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नियमावलीचे पालन न करता मनमानी करून हेतुपरस्सर तयार केल्याची बाब आमदार रवि राणा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांच्या लक्षात आणून दिली. महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी शुक्रवारी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.आमदार राणा यांच्या तक्रारीनुसार, महापालिका आयुक्त प्रशांत राेडे यांच्या अधिनस्थ तयार केलेला प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा हा जनतेसाठी अन्यायकारक ठरणारा आहे. या आराखड्यानुसार अमरावती महापालिका झाल्या तर नागरिकांना येणाऱ्या पाच वर्ष सातत्याने त्रास सहन करावा लागेल. प्रभागाच्या विकासासंदर्भात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित राहावे लागेल. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी हेतुपरस्पर केलेल्या या रचनेमुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी केली नाही. राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कारभार केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना प्रारूप आराखड्याला स्थगिती देण्यात यावी. ज्या अधिकाऱ्यांनी हा चुकीचा आराखडा तयार केला त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रवि राणा यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन या आराखड्याला स्थगिती देण्याचे व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी अमरावती यांचे अधिपत्याखाली नवीन आराखडा तयार करण्याचे तसेच यासाठी दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वस्त केले, असे आमदार रवि राणा यांना सांगितले.