अमरावती : फेब्रुवारी महिन्यात येथे उघड झालेल्या ‘मानवी तस्करी’ प्रकरणातील आकाश वेरूळकर याचा १ फेब्रुवारी रोजीच मध्यप्रदेशातील इंदूर येथे आकस्मिक मृत्यू झाल्याचे तब्बल सव्वा पाच महिन्यांनंतर उघड झाले. गुन्हे शाखेने बुधवारी हा उलगडा केला. २९ जानेवारी रोजी आकाश वेरूळकर (२५, रा. महात्मा फुलेनगर, नवसारी, अमरावती) हा घरून बेपत्ता झाल्याची नोंद गाडगेनगर पोलिसांनी घेतली होती.
येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजस्थानी कुटुंबाला विकण्यात आले. एका राजस्थानी व्यक्तीशी बळजबरीने तिचा विवाह लावून देण्यात आला; मात्र दहा दिवसांनंतर तिने तेथून पळ काढून अमरावती गाठले. त्यानंतर मानवी तस्करी अर्थात ह्यूमन ट्रॅफिकिंगचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी पाच जणांविरुद्ध अपहरण व मानवी तस्करीचा गुन्हा दाखल केला.
ती अल्पवयीन मुलगी आकाश वेरूळकर याच्यासोबत २७ जानेवारी रोजी इंदूरला गेल्याचे तपासात समोर आले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर दोघांमध्ये फाटाफूट झाली. त्यामुळे २७ पासूनच बेपत्ता असलेल्या आकाशच्या शोधार्थ पोलिसांचे विविध पथके इंदूरसह, बऱ्हाणपूर, रतलाम गेले होते. मात्र, त्या वेळी त्याचा शोध लागू शकला नव्हता.
आकाशसोबत गेलेली मुलगी परतली
दरम्यान, आकाशसोबत गेलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १२ फेब्रुवारी रोजी घरी परतल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेने आपणास अमरावतीच्या बसस्थानक परिसरातून भूलथापा देऊन रतलाम येथे नेले. आरोपींनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवून राजस्थानला चार ते पाच लाखांमध्ये विकले. तत्पूर्वी, त्यांनी मध्य प्रदेशातील रतलाम येथे आपले लग्न लावून दिले. रतलाम येथे लग्न लागत असताना आकाशसोबत असल्याची कबुली तिने दिली होती.
मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे हे या प्रकरणाचा तपास करत असताना इंदूरनजीकच्या एका पोलीस ठाण्यात मर्ग दाखल असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेथे जाऊन तपास केला असता, ती नोंद आकाश वेरूळकरची असल्याचे लक्षात आले. १ फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेह इंदूरनजीक आढळून आला होता. इंगळे यांनी पीएम रिपोर्ट पाहिला असता त्याचा मृत्यू कार्डियक अटॅकने झाल्याचे स्पष्ट झाले. सबब, आकाशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाल्याचे इंगळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.