लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात कुपोषणमुक्ती व आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून राबवलेले ‘मिशन २८’ प्रभावी ठरले आहे.मेळघाटात कुपोषणमुक्तीसाठी सातत्यपूर्ण मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार मेळघाटात पाड्यापाड्यांवर अधिकारी व कर्मचारी यांच्या गृहभेटी, आवश्यक उपचार, सल्ला व पाठपुरावा याद्वारे २८ दिवस मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान उपचारांबरोबरच समुपदेशन व जनजागृती हा घटक महत्त्वपूर्ण ठरला. कमी वजन असलेल्या एका बालकाला रुग्णालयात संदर्भित करण्याबाबत त्याचे कुटुंबीय तयार नव्हते; पण आरोग्य पथकांनी केलेल्या प्रभावी समुपदेशनाने कुटुंबीयांचे मन वळविण्यात यश मिळाले. त्या बालकास भरती करण्यात आले व उपचारानंतर त्याचे वजन वाढून प्रकृती सुखरूप आहे. एका मातेच्या अंगावर सूज व लघवीत प्रोटीन आढळून आले. तिला वेळीच उपचार मिळाल्याने ती सुखरूप आहे. या मोहिमेत आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, भरारी पथक, समुदाय अधिकारी, आरोग्यसेविका, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या पाड्यापाड्यांवर भेटी वाढल्याने प्रभावी जनजागृती व पाठपुरावा झाला. माता व बालकाचे धोके व जोखीम ओळखून आजाराचे निदान लवकरात लवकर करण्यात यश आले.जे नवजात बालक कमी वजन, हायपोग्लासेमिया, हायपोथर्मिया, अतिसार, तीव्र जंतुसंसर्ग, न्यूमोनिया, नवजात बालकांना होणारा कावीळ आदींमुळे ग्रस्त होते, त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्यात आला. माता व बालकाचे निरंतर निरीक्षण, पाठपुरावा व तपासणी २८ दिवसांपर्यंत करण्यात आली. मोहिमेत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या गृहभेटींची छायाचित्रांसह नोंद ठेवली. त्यामुळे मोहिमेत ही व्यापक प्रक्रिया परिपूर्णपणे राबविण्यात यश मिळाले.