अमरावती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा काल आटोपला. विदर्भ एक्स्प्रेसने आगमन अन् अमरावतीतून अंबानगरी एक्स्प्रेसने प्रस्थान झाले.
राज ठाकरे रेल्वेने प्रवास करताहेत म्हटल्यावर सुरक्षा यंत्रणा चौकस होतीच, शिवाय कार्यकर्तेही अलर्ट होते. नुसते पद घेऊन मिरवत असाल तर खबरदार, सामान्य माणसासाठी झटावं लागेल, पक्षवाढीसाठी जीवाचं रान करणाराच पक्षात टिकेल, असे सांगत अमरावतीच्या विभागीय बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. पक्ष बांधणीसाठी झालेल्या या दौऱ्यात राज यांना अनेक बाबींचा उलगडा झाला.
राज ठाकरे यांची लोकप्रियता कायम असताना मनसेचा ग्राफ मात्र वाढत का नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाळ जोपर्यंत सामान्यांशी जुळत नाही, तोपर्यंत पक्ष काही वाढणार नाही, ही बाब राज यांनी हेरली. त्यामुळेच की काय त्यांनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत विदर्भात पक्षात फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले.
कालपर्यंत सक्रिय नसलेले पदाधिकारी अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आले. अमरावतीत मात्र मनसेतही गटबाजी आहे, ही बाब प्रकर्षाने जाणवली ती राजसाहेबांच्या होर्डिंग्जवरून. त्यामुळे विभागीय बैठकीत पाहिजे तशी गर्दी दिसली नाही. शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे मनसेला पक्षवाढीची ही संधी चालून आली आहे. विदर्भात मनसेची पाळेमुळे रुजली की त्याचा फटका आपसूकच शिवसेनेला बसणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा मनसेसाठी महत्त्वाचा मानला जातो. येत्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करण्याचा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला; परंतु त्यासाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आवश्यक आहे. नागपुरात तर पक्षात काही चुकीच्या गोष्टींना थारा दिला जात असल्याचे खुद्द राज ठाकरे यांनी मान्य केले.
नागपुरात किंबहुना विदर्भात जसा पक्ष दिसायला हवा होता तसा दिसत नसल्याचे मान्य करीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. अमरावतीतही तशीच स्थिती आहे. राज ठाकरे यांच्या दाैऱ्यानिमित्त अमरावतीत या पक्षाची उपस्थिती दिसली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पक्षवाढीसाठीची तळमळ राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यातून दिसून आली, हे मात्र खरे. अनेक तरुण-तरुणींच्या मनात ‘फायर’ आहे, असे सांगत त्यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नव्याने पक्ष बांधणीचा राज यांचा संकल्प पक्षातील अनेकांना ‘जय महाराष्ट्र’ करणारा ठरणार आहे.