अनिल कडू
परतवाडा : महाराष्ट्र वनविभागाचे बोधचिन्ह वापरण्याचा अधिकार नसताना, तो असल्याचे भासवून, त्याचा गैरवापर केला जात असल्याची तक्रार आमदार प्रताप अडसड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांकडे २४ मे रोजी केलेल्या तक्रारीनुसार, राज्य वन्यजीव मंडळाचे शासननियुक्त सदस्य यादवराव तरटे पाटील (रा. अमरावती) हे वनविभागाचे बोधचिन्ह अधिकार नसताना वापरत आहेत. त्यांनी आपल्या लेटर पॅड वर महाराष्ट्र वनविभागाचे बोधचिन्ह (लोगो) अंकित केला आहे. या लेटर पॅडवर वनविभागासह राज्य शासनाकडे वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा पत्रव्यवहार होतो. हे बोधचिन्ह वापरूनच ते सर्वत्र पत्रव्यवहार करतात. ही बाब फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जबर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावे, अशी आ. प्रताप अडसड यांची मागणी आहे. या तक्रार पत्राची प्रत त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांना दिली आहे.
-----------
भारतीय वन्यजीव अधिनियमांतर्गत वनविभाग कार्यरत आहे. शासनाचे राज्य वन्यजीव मंडळ त्या अंतर्गत येते. या मंडळाचा शासन नियुक्त सदस्य म्हणून मला वनविभागाचे बोधचिन्ह वापरता येते. वनअधिकाऱ्यांशी चर्चा करूनच हे बोधचिन्ह लेटरपॅडवर घेतले आहे. कोल्हापूरचे रोहन भाटे हेदेखील या लोगोचा वापर करीत आहेत.
- यादव तरटे पाटील, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ