अमरवाती : प्रहार जनशक्ती पक्षाला एनडीएच्या बैठकीचे पत्र मिळाले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माजी राज्यमंत्री तथा बच्चू कडू यांना १८ जुलैला दिल्ली येथे होणाऱ्या मित्रपक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. या बैठकीदरम्यान बच्चू कडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपआपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. १८ जुलैरोजी एनडीएची नवी दिल्लीत बैठक होत असून, जवळपास ३० पक्ष यात सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एनडीएची बैठक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात सहकारी पक्षांशिवाय भाजपने नवीन मित्रपक्षांना आणि माजी सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे.
एनडीएच्या बैठकीसाठी आम्हाला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून निमंत्रण मिळाले आहे. पण अद्याप आमचा प्रहार जनशक्ती पक्ष एनडीए मध्ये सामील झालेला नाही, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. कडू हे नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकरी आणि दिव्यांगांच्या समस्या, अचलपूर येथील बंद पडलेल्या फिनले मिल विषयी तसेच इतर मुद्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी माध्यमांना दिली. दरम्यान विविध राज्यांतील छोट्या पक्षांना एकत्र आणून एनडीए मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मिळालेल्या निमंत्रणाकडे पाहिले जात आहे.