गणेश वासनिकअमरावती : गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही आमदारांतील हा वाद आता चांगलाच पेटला आहे. आमदार राणा यांच्याविरूद्ध ५० कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.
तसेच शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.आमदार बच्चू कडू यांच्या मते, गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करावे, असा आक्रमक पवित्रा आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. १ नोव्हेंबरपर्यंत आमदार रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे सिद्ध करावे, या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे आमदार कडू म्हणाले. अमरावती येथील महापालिका टाऊन हॉल येथे १ नाेव्हेबर रोजी राज्यभरातून प्रहारचे हजारो कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करतील अशी ही माहिती बच्चू कडू यांनी दिली.खोके घेतले की नाही, हे अगोदर स्वत:च आमदार बच्चू कडू यांनी ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करून घ्यावी, तेव्हा सत्य बाहेर येईल. लोकशाहीत कोणाला कोणावरही दावा ठोकता येतो. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिले जाईल. आई संदर्भात राजापेठ पोलिसात कोणी तक्रार दिली याची माहिती आहे.- रवी राणा आमदार, बडनेरा