चांदूर बाजार (अमरावती) : तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना येथील १४ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यांना २४ कोटी रुपये मदतीसाठी अनेकवेळा घोषणा होऊनही रक्कम उपलब्ध झाली नाही. मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त आ. बच्चू कडू आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १५ जूनपासून मंत्रालयात बेमुदत उपोषण करणार आहेत.
गेल्या खरीप हंगामातील जुलै-ऑगस्ट महिन्यात चांदूर बाजार तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात आसेगाव व तळेगाव मोहना या दोन मंडळांना पर्जन्यमापक यंत्राच्या तांत्रिक अडचणीमुळे अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याने वगळण्यात आले. ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर या दोन मंडळांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रशासनाकडून शासनाला मदतीची मागणी करण्यात आली.
अर्थसंकल्पात ७६ कोटींची मदत घोषित करण्यात आली. यात या दोन मंडळांतील १४ हजार शेतकऱ्यांच्या २४ कोटी निधीचा समावेश आहे. यासाठी आ. बच्चू कडू यांनी मदत व पुनर्वसन सचिवांशी संपर्क साधून मदत निधी तत्काळ देण्याचे निर्देश दिले. तथापि, काहीही झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेले आ. बच्चू कडू हे १५ जून रोजी मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे सचिव यांच्या दालनातच बेमुदत उपोषण करणार आहेत.