दर्यापूर : छत्रपती संघटनेचे अध्यक्ष कपिल पडघान यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओतून आ. बळवंत वानखडे व आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांना हुकूमशाही व दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्याचे ऐकावयास मिळते. आम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहोत. वेळ पडली, तर दर्यापूर मतदारसंघातही येऊ, असा धमकी वजा इशारा व्हिडिओतून देण्यात आल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
कोविड केअर सेंटरचा गलथान कारभार उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला धमकावले. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. हिंमत असेल, तर आम्हाला धमकावा, असा इशाराही व्हिडिओतून देण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंदर्भात आमदार बळवंत वानखडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. आमदार बळवंत वानखडे किंवा बाळासाहेब हिंगणीकर यांच्यावतीने अद्याप तरी पोलिसांत कुठलीही तक्रार नोंदविली गेली नाही. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.