अमरावती : जिल्हा परिषदेत पाणीटंचाई निवारणाबाबत विशेष सभेत तत्कालीन गटविकास अधिकारी सुभाष बाेपटे यांच्यावर साउंड माईक आणि पाणी बाॅटल फेकून मारल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य आणि मोर्शीचे विद्यमान आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना तीन महिन्यांचा कारावास व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने साेमवारी ठोठावला. दरम्यान, पीआर बाॅन्डवर आमदारांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
२८ मे २०१९ रोजी जिल्हा परिषदेत पाणीटंचाईबाबत विशेष सभा आयाेजित करण्यात आली होती. या सभेत तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आदी उपस्थित होते. दुपारी ३.१५ ते ३.४० या दरम्यान देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन बीडीओ सुभाष बाेपटे यांच्या अंगावर माईक आणि पाणी बाॅटल फेकली. त्यामुळे या सभेवर सीईओंसह अन्य अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला. गाडगेनगर ठाण्यात मनीषा खत्री यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सुनवणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. पुराव्याच्या आधारावर भादंविचे कलम ३५३ अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीशांनी सोमवारी देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा साधा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.
जनतेने निवडून दिले होते. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी आहे. उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालयाचा निर्णय मला मान्य आहे. न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे. सध्या जामीन मंजूर केलेला आहे.
- देवेंद्र भुयार, आमदार