अमरावती : खासदार नवनीत कौर राणा व आमदार रवि राणा यांचा कोरोना अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत राणा कुटुंबीयात १६ सदस्य कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. तूर्तास खासदार नवनीत राणा यांनी ‘होम आयसोलेशन’चा निर्णय घेतला आहे. रवि राणा यांची चाचणी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता शैजल मित्रा यांच्या देखरेखीत झाली. मात्र, शुक्रवारी थ्रोट स्वॅब चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
खासदार राणा या काही दिवसांपासून मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरीच होत्या. गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांना अचानक अस्वस्थ वाटत असल्याने स्वत: पुढाकार घेत अॅन्टिजेन चाचणी करून घेतली. या चाचणीत खासदार राणा यांच्यासह पाच सदस्य संक्रमित आढळले आहेत. मात्र, थ्रोट स्वॅब अहवाल यायचा असल्यामुळे तूर्त त्यांनी घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांचे सासू, सासरे, जाऊ, मुले, भाचे, नणंद, जावई असे १० सदस्य कोरोना संक्रमित आढळले आहेत. यापैकी बहुतांश सदस्यांवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आमदार रवि राणा हे नागपूर येथे आहेत. ते कोरोना संक्रमित रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराबाबत काळजी घेत अससताना त्यांनादेखील अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांचा थ्रोट स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तेसुद्धा पॉझिटिव्ह आले. आमदार रवि राणा यांची ७ वर्षीय कन्या आणि ४ वर्षीय मुलगासुद्धा कोरोना संक्रमित आढळला आहे. त्यांचे मोठे बंधू सुनील राणा हेच कोरोनापासून दूर आहेत. राणा कुटुंबीयातील सदस्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे.
कुटुंबीयात आतापर्यंत १६ सदस्य कोरोना संक्रमित आढळले आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. कोरोना नियमावलींचे पालन करावे. - नवनीत राणा, खासदार, अमरावती.
केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार कोरोनाबाबत निर्णय घ्यावा लागतो. खासदार, आमदार दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली असून, महापालिका रॅपिड रिस्पॉन्स चमू पुढील निर्णय घेईल. होम आयसोलेशनचा पर्याय आहे. राणा दाम्पत्य कोणता निर्णय घेतात, त्यावर अवलंबून आहे. - श्यामसुंदर निकम, शल्यचिकित्सक, अमरावती