अमरावती : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याची जाहीर भूमिका घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यात अपक्ष आमदार रवी राणा यांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर हनुमान चालिसेचं पठण करू असं आव्हान रवी राणा यांनी केलं आहे.
मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत न उतरवल्यास मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा वाजविण्याच्या मनसेच्या भूमिकेमुळे पोलीस यंत्रणेपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. यात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नुकतचं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यादेखील काही महिलांसोबत हनुमान चालिसा पठण केल्याने चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण करून मंदिरावर भोंगादेखील लावणार असल्याचं म्हटलं आहे.
आम्ही दोघे नेहमीप्रमाणे हनुमान चालिसा वाचणार असल्याचं नवनीत राणा यांनी जाहीर केलं. तर दुसरीकडे, रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं आहे. हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठण करावे, असे रवी राणा म्हणाले आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला आहे.
राज ठाकरेंनी दिलाय राज्य सरकारला इशारा
पुढील महिन्यात ३ मेला देशभरता ईद साजरी केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे खाली न उतरवल्यास मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.