सध्या आम्ही कोणाच्याही बाजुने नाही आहोत. आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार, असल्याचं ठाकरे सरकारमधील माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटासोबत असलेल्या बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
महायुतीत अमरावतीची जागा आम्हाला हवी आहे, असे सांगताना अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी हवे तर प्रहारच्या तिकीटावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. अकोला, अमरावतीसह तीन जागा आम्हाला हव्या आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडूंच्या या विधानावर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर, कारण त्यांना प्रहारवर विजयी होणार याची शाश्वती नाही, असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच बच्चू कडू महायुती धर्म पाळावा लागेल. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली. तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू, असं सांगत लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केल्यास त्याचे परिणाम होतील, असा इशारा देखील रवी राणा यांनी दिला आहे.
विधानसभेला १५ जागांवर लढणार- बच्चू कडू
लोकसभेला ३ आणि विधानसभेला १५ जागांवर लढणार आहोत. येत्या १५ जानेवारीनंतर बैठक घेऊन पुढील भुमिका मांडू असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसोबत लग्न करणे म्हणजे आगीत उडी घेतल्यासारखे झाले आहे. शिपायाला, हॅाटेलमध्ये काम करणाऱ्यांना मुली देतात. पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पॅकेज देऊन काही उपयोग नाही, कायमस्वरुपी तोडगा हवाय. या साऱ्याला सरकार जबाबदार आहे, असा आरोपही कडू यांनी शिंदे सरकारवर केला आहे.