अमरावती : अमरावती जिल्हा हा गत काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी देशपातळीवर ‘हॉट’ ठरत आहे. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी करावी लागली. या दाम्पत्याने काही दिवसांपूर्वी आमदार ठाकुरांना ‘टार्गेट’ केले होते. हा वाद शमत नाही तोच मंगळवारी ओबीसी मेळाव्यात डॉ. अनिल बाेंडे यांनी यशोमतींकडे रोख करीत इंग्रजांची चाकरी केली म्हणून ‘ठाकूर’ पदवी मिळाली, असे वादग्रस्त विधान केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार यशोमती ठाकूर यांनी डॉ. अनिल बोंडे यांचा खरपूस समाचार घेतला.
आडनावावरून राजकारण का करता? त्यांच्या बाेंडअळ्या कुठून आल्यात? मी महिला आमदार आहे, याचे भान ठेवा, अशी तंबीदेखील त्यांनी दिली. तुम्हाला इतिहास माहिती नाही, तर इतिहासाची पाने जरा वाचा, असे म्हणत डॉ. बोंडे यांच्या सडक्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उभे केले. आमदार यशोमती ठाकूर विरुद्ध खासदार अनिल बाेंडे हे ‘पॉलिटिकल वॉर’ कोणते वळण घेते, हा येणारा काळच ठरवेल.
खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसच्या नेत्या आ. यशोमती ठाकूर प्रचंड आक्रमक झाल्या. माझ्याच मतदारसंघात येऊन महिलांविषयी अपमानास्पद बोलणे ही कुठली संस्कृती आहे, असे जोरदार टीकास्त्र त्यांनी सोडले. बोंडेंना इतिहास माहिती नाही, तर त्यांनी तो जरा वाचून घ्यावा, असा सल्लाही आ. यशोमती ठाकूर यांनी दिला.
डॉ. अनिल बोंडे ‘मेंटल’ झाले का? : आमदार यशाेमती ठाकूर
आडनावावरून राजकारण केले जाते, ही खेदजनक बाब आहे. ‘ठाकूर’ या नावाचा इतिहास बघा. गॅझेटमध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून आजोबांची नोंद आहे. उगाच काही तरी बोलायचे, राजकारणासाठी राजकारण करायचे, हे खपवून घेतले जाणार नाही. मी महिला आमदार आहे. खरे तर खासदार डॉ. अनिल बाेंडे यांना वेडेपणाची लक्षणे सुरू झाल्याचे दिसून येते. डॉ. अनिल बोंडे सध्या नैराश्यात आहे. त्यांनी इतिहास वाचला पाहिजे. बोंडे यांच्या बोंड अळ्या आल्या आहे का, असे आम्ही विचारावे का, असेही त्या म्हणाल्या. आमच्या मतदारसंघात येऊन बोलता. मी महिला आहे. महिलांचा मान-सन्मान करायचा असतो, हे बोंडे यांना कळत कसे नाही, अशी जोरदार टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. संत्रा गळाला आहे. सोयाबीनला भाव नाही. शेतकरी प्रश्न सोडविण्याऐवजी डॉ. अनिल बोंडे यांना ‘ठाकूर’ आडनावावरून राजकारण करण्यात स्वारस्य दिसून येते, असे आमदार ठाकूर यांनी खासदार बोंडे यांच्यावर टीका केली.
इंग्रजांची चाकरी केली म्हणून ठाकूरकी : खासदार डॉ. अनिल बोंडे
तिवसा येथे ओबीसी मेळाव्यात बोेलताना भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या घराण्याला ‘ठाकूर’ पदवी मिळाली ती इंग्रजांची चाकरी करून. हाच त्यांचा डीएनए आहे, असे वादग्रस्त विधान केले. आमदार ठाकूर यांनी चमकोगिरीसाठी पोस्टरबाजी लावल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचा डीएनए हा भारतीयांचा असून, काँग्रेसचा डीएनए हा फिरोज जहांगीर गांधी यांचा असल्याची बोचरी टीकाही खासदार डॉ. बोंडे यांनी केली.