पार्किंगबाबत मुजोरी : कुबडे हाईट्सोबतचा करार दडपला अमरावती : ‘पार्किंग आॅन ओन रिस्क’ असा फुकटचा सल्ला देऊन ग्राहकांची अवहेलना करणाऱ्या रिलायन्स ट्रेंड्झने महापालिकेची फसगत चालविली आहे. भाडेकरु म्हणून ‘कुबडे हाईट्स’सोबत केलेला करार रिलायन्स ट्रेंड्झने दडपला असून त्यामुळे ‘कर’ चोरीही केली आहे. तीन वर्षांपूर्वी रिलायन्स ट्रेंड्झकडून कुबडे हाईटसने मोक्याची जागा पटकावली. दोघांमध्ये जागेबाबत करारनामा झाला. मात्र, तो करारनामा मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदणीबद्ध करण्यात आला नाही. पार्किंगबाबत त्यात कुठलीही तरतूद न करता विनापार्किंग भाडेकरार करण्यात आला. ‘रिलायन्स ट्रेंड्झ’ या महागड्या ‘शोरुम कम मॉल’ ला अधिकृत पार्किंग उपलब्ध नाही. असे असताना ‘रिलायन्स ट्रेंड्झ’शी झालेला भाडेकरार दडपण्यात आल्याने ‘कुबडे हाईट्स’ अधिक व्यावसायिक कराच्या कक्षेच्या बाहेर आहेत. रिलायन्स ट्रेंड्झ आणि हॉटेल रेलिश हे दोन्ही भाडेकरु ‘आॅनपेपर’ न दाखविल्याने यादोन भाडेकरुंच्या पार्किंगबाबतही कुबडे हाईटस्ने हात वर केले. कुबडे हाईट्सला पार्किंग उपलब्ध असल्याने रिलायन्स ट्रेंड्झला किंवा कुबडे हाईट्सला महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली नाही. त्यामुळे रिलायन्स ट्रेंड्झसह कुबडे हाईटसचेही फावले. अशाप्रकारे उभय प्रतिष्ठानांनी सर्वसामान्य ग्राहकांसह महापालिकेचीही फसगत चालविली आहे. मिळेल का नोटीस? पार्किंगची जागा उपलब्ध न करता अमरावतीकरांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या रिलायन्स ट्रेंड्झला महापालिका प्रशासन नोटीस पाठवेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंग व्यवस्था नसूनही ग्राहकांना सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यास बाध्य करणाऱ्या रिलायन्स ट्रेंड्झस ला झोनस्तरावरुन नोटीस बजावावी, अशी अपेक्षा अमरावतीकर नागरिक व्यक्त करीत आहेत.
रिलायन्स ट्रेंड्झकडून मनपाची फसगत
By admin | Published: November 12, 2016 12:12 AM