अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण नवी दिल्लीच्या सुब्रमण्यम सभागृहात १९ ते २० डिसेंबरला होणार आहे. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील पुरस्कारासाठी मनरेगा आयुक्तालय नागपूर यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातून सदर पुरस्कारासाठी अमरावतीसह यवतमाळ, गोदिंया, गडचिरोली या चार जिल्ह्यांचे नामांकण सादर करण्यात आले होते. त्यानुसार दिल्ली येथे अवार्ड समितीसमोर सादरीकरणासाठी जिल्ह्याची निवड करून बोलविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तत्कालीन सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त जिल्हाधिकारी मिताली सेठी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी माया वानखडे यांनी अंमलबजावणीचे सादरीकरण २९ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे केले होते. त्या आधारे केंद्र सरकारच्या चमूने ७ डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील भातकुली, चिखलदारा, चांदूर बाजार या तीन तालुक्यांत प्रत्यक्ष भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या कामांची पाहणी केली.अमरावती जिल्ह्याला सन २०१८-१९ या वर्षात ७८ लाख ८१ हजार मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात जिल्ह्याने ८४ लाख ८४ हजार दिवसांत उद्दिष्ट (१०७ टक्के) साध्य केले. त्या वर्षात जिल्ह्यात या योजनेवर एकूण २३० कोटी ९१ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्या वर्षात २ लाख ६ हजार ३७७ व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. अमरावती जिल्ह्याने रोजगार हमी योजनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात केला आहे.कोटमनरेगात जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाली, ही अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारापेक्षा जास्तीत जास्त लोकांना रोजगातून लाभ देऊ शकले, याचे समाधान आहे. याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावतीकोटजिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कामांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार झाल्याचा आनंदच असून, अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.- माया वानखडे,उपमुख्यकार्यकारी अधिकारी रोहयो विभाग झेडपी अमरावती
मनरेगाचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्ह्याला जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 9:44 PM