अमरावती : गोवंश तस्करीच्या संशयावरून संतप्त जमावाने ट्रकमधील तिघांना बदडले. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मध्यप्रदेशातील नर्मदापुरम होशंगाबाद जिल्ह्यातील सिवनीच्या माळवा परिसरातील ब्रखाड गावाजवळ मंगळवारी रात्री घडली. मृताचे नाव नाझिर अहमद असून तो अमरावती येथील रहिवासी आहे. शेख लाला (३८) व सय्यद मुश्ताक (४०) हे जखमी आहेत. ते नर्मदापुरम जिल्ह्यातील नांदेरवाडा येथे गोवंश घेऊन जात होते, अशी माहिती आहे. पोलिसांनी 'मॉब लिंचिंग'चे वृत्त फेटाळले आहे.
अमरावती येथून आलेला ट्रक ब्रखाड गावाजळ मध्यरात्री १ च्या सुमारास १० ते १५ नागरिकांनी अडविला आणि गोवंश तस्करीचा संशय असल्याने ट्रकमधील तिघांवर हल्ला चढविला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांनाही रुग्णालयात हलविले. मात्र, रात्री उशिरा त्यातील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.
'मॉब लिंचिंग'ची दुसरी घटना
सिवनीच्या कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोहत्येच्या संशयावरून यापूर्वी तीन आदिवासींना लाठ्याकाठ्यांनी मारहाण झाली होती. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या संबंधाने जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांना विचारले असता त्यांनी 'मॉब लिंचिंग' झाल्याचे नाकारले. पोलीस अधीक्षक गुरकरण सिंह यांनी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले.