अमरावती : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बहुतांश वाहन चालक हे बिनधास्तपणे भ्रमणध्वनीवर बोलत वाहन चालवितात. ही बाब जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे शिक्षेत वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोबाईल हे भविष्यात मानवी जीवानाचे कर्दनकाळ तर बनणार नाही ना, अशी भीती राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे व्यक्त केली.येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ११ ते २५ जानेवारी दरम्यान आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किरण गित्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त सुरेश मेकला, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अविनाश भातुसे, एसटी मंहामंडळाचे विभागीय नियंत्रक महाजन, प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. के. वाडेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, आजची जीवनशैली धावपळीची असली तरी प्रत्येकांनी जबाबदारीचे पालन केल्यास कोणतीही घटना टाळणे शक्य आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळेच वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत. परंतु परदेशात वाहन चालक हे वाहतूक नियमावलीचे काटेकोर पालन करीत असल्याची बाब त्यांनी आवर्जून सांगितली. वाहतूक नियमावलीचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध अधिक रकमेची दंडात्मक कारवाई करा, जेणे करुण नियमाचे पालन होईल व शासनाच्या तिजोरीत महसूलही जमा होईल, असे ते म्हणाले. आपलेपणाची भावना ठेवून अधिकाऱ्यांनी लोकांच्या मनात जागा बनविली पाहिजे, असे म्हणत एखादी घटना होणार असे दिसून येत असताना ती होऊच नये, यासाठी तत्पूर्वी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. माजी राष्ट्रपती अबुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी 'व्टेन्टी इंडिया' घडवायचा आहे, अन्यथा हीच स्थिती राहिल्यास 'व्टेन्टी मॅच' बनेल, असे ते म्हणाले. अपघातात घरातील कर्ता माणूस गमावला तर त्या घरातील काय अवस्था होते, हा विचार न केलेलाच बरा. वाहन चालविताना जबाबदारी स्वीकारली तर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याची गरज राहणार नाही, असा संदेश देताना अधिकाऱ्यांनीसुद्धा जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे, असा टोलाही पालकमंत्र्यांनी लगावला. ट्रक, वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. प्रास्ताविक एस. के. वाडेकर यांनी तर संचालन ज्योती तोटेवार व आभार प्रदर्शन एम. बी. नेवस्कर यांनी केले.
मोबाईल मानवाच्या जीवनाचे खेळणे बनू नये
By admin | Published: January 11, 2015 10:42 PM