अमरावती : स्थानिक जयस्तंभ चौकातील दोन प्रतिष्ठान फोडून सुमारे १५ लाखांचे मोबाईल पळविण्यात आले होते. त्या घटनेला पंधरवडा उलटत असताना शहर कोतवाली पोलीस रिक्त हस्तेच आहेत.
स्थानिक पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधार्थ नागपूर, आसपासचे जिल्हे व थेट बिहारमधील एका गावातदेखील जाऊन आले. मात्र, ती टोळी बिहारमार्गे नेपाळमध्ये परागंदा झाल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. ते चोर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमेवरून नेपाळमध्ये दाखल झाल्याने शहर पोलिसांचा नाईलाज झाल्याची माहिती पुढे आली आहे.
१४ ऑक्टोबर रोजी पहाटे बकुल एंटरप्रायजेस व आर.के. टेलिकॉम या दुकानांचे शटर वाकवून १४.६९ लाख रुपयांचे मोबाईल फोन लंपास करण्यात आले होते. आरकेमधील सीसीटिव्हीत पाच जणदेखील बंदिस्त झाले. तथा ते मध्यवर्ती आगारात पोहोचल्याची नोंददेखील फुटेजमधून पोलिसांना प्राप्त झाली. चोरांचा मागमूस लावण्यासाठी चोरीस गेलेले मोबाईल ट्रॅकिंगवर टाकण्यात आले. तर, तपासासाठी शोधपथके कार्यान्वित करण्यात आली. त्यातील एक पथक चार दिवसांपूर्वी बिहारमध्ये पोहोचले. आरोपींची नावे माहिती झाल्याने संबंधित गावापर्यंतदेखील पोहोचले. तेथे दोन दिवस राहिले. आरोपींच्या घरी जाऊन आले. मात्र, नेपाळची सीमा अवघ्या तीन किलाेमीटरवर असल्याने ते तिकडे परागंदा झाल्याने पोलीस पथकाला परवानगीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे आरोपींच्या घरापर्यंत पोहोचूनदेखील त्यांना आरोपीशिवाय परत यावे लागल्याची माहिती खास पोलीस सूत्रांनी दिली.
तपास सुरू
याबाबत शहर कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज यांच्यानुसार, तपास योग्य ट्रॅकवर आहे. तपासपथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे फारसे स्पष्ट दिसत नसल्याने पोलीस तपासाला मर्यादा आल्या आहेत. शहर कोतवाली हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटना देखील भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांच्या प्रभावी गस्तीची गरज आहे.