अतिक्रमण कायमच : पोलीस-महापालिकेचे दुर्लक्षअमरावती : काही दिवसांपूर्वी शहरात चहुकडे अतिक्रमण दिसून येत होते. मात्र, पोलीस व महापालिकेच्या कारवाईमुळे अतिक्रमण बऱ्याच प्रमाणात कमी झाले. आता अतिक्रमणधारकांनी नवा फंडा शोधून काढला असून आता खाद्यपदार्थासह भाजीपाला, गुळपट्टी, पानठेले, फळे आदींच्या विक्रीसाठी मोबाईल व्हॅनचा वापर केला जात आहे. मोबाईल व्हॅनची ही वाढती संख्या अतिक्रमणात भर टाकणारी आहे. शहराच्या दाट वस्तीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून बहुतांश व्यावसायिकांनी मध्यवस्तीतील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, सरोज चौक, गांधी चौक व राजापेठ परिसरात रस्त्याच्या कडेला दुकाने थाटल्याने अतिक्रमणात भर पडली होती. अतिक्रमणात अंबानगरीचा अव्वल क्रमांक लागतो की काय, अशी स्थिती होती. सद्यस्थितीत देखील शहरातील विविध मार्गांवरील फुटपाथ किंवा शासकीय मोकळ्या जागेवर कब्जा करून दुकाने थाटली जात आहेत. या अतिक्रमणाविरूध्द मागील काही दिवसांत महापालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने मोहीम चालविल्याने व्यावसायिकांची धाबे दणाणले होते. अनेक ठिकाणी महापालिकांनी व्यावसायिकांना दंड ठोठावला तर पोलीस विभागाने अनेकांवर फौजदारी कारवाई सुध्दा केली आहे. आता या अतिक्रमण मोहिमेचा धसका व्यवसायिकांनी घेतला आहे. मात्र, मोहीम थंडावताच पुन्हा व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवसाय थाटणे सुरु केले आहे. मात्र, आता कारवाईच्या धसक्याने काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला दुकाने न थाटता ‘मोबाईल व्हॅन’चा पर्याय निवडला आहे. अनेक व्यावसायिकांनी चारचाकी वाहन खरेदी करून बिनबोभाट व्यवसायाला सुरूवात केली आहे. ‘मोबाईल व्हॅन’मधून विविध वस्तू, साहित्य व खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. ही मोबाईल व्हॅन शहरातील कुठल्याही मार्गावर उभी करून ग्राहकांना आकर्षित केले जाते. बडनेरा मार्गावरील समर्थ हायस्कूल, सरोज चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, जि.प.समोर अशा ठिकाणी या व्हॅन व्यवसाय करताना आढळून येतात. रस्त्यावरील दुकानदारीमुळे अनेकदा वाहतूक सुध्दा विस्कळीत होते. मात्र, याकडे पोलीस प्रशासनासह महापालिका प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पोलीस दिसताच वाहन दामटतात पुढे अतिक्रमणधारक चारचाकी वाहनांना वेगळे स्वरूप देऊन या वाहनांमधून व्यवसाय करीत आहेत. विविध मार्गांवर हे वाहन थांबवून ते वस्तू विक्रीला सुरूवात करतात. या वाहनाकडे पोलिसांचे लक्ष जाताच ते वाहन पुढे दामटले जाते. काही अंतरावर ते थांबवून पुन्हा नव्या जोमाने हा व्यवसाय सुरू केला जात असल्याचे चित्र आहे.
‘मोबाईल व्हॅन’ची दुकाने व्यावसायिकांचा नवा फंडा
By admin | Published: April 16, 2016 12:10 AM