अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हिवाळी २०२० आणि उन्हाळी २०२१ परीक्षांच्या अनुषंगाने विषय प्राध्यापकांकडून आलेल्या प्रश्नावलींचे ‘मॉड्रेशन’ सुरू केले आहे. १७ ते ३० मार्च या दरम्यान प्रश्नांची पडताळणी होऊन पेपर सेट तयार होणार असून, त्यानंतर छपाईसाठी पाठविले जाणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार मॉड्रेशनसाठी ४८ (३) अ अन्वये समिती नेमली आहे. यात परीक्षा मंडळाचे अध्यक्ष, विषय तज्ञ्जांचा समावेश आहे. ही समिती विषय प्राध्यापकांकडून आलेल्या प्रश्नावलींची पडताळणी करताना प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारित आहे अथवा नाही, गुणांची वर्गवारी, विषयानुरुप प्रश्न आदींची पडताळणी करते. अनावधाने अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न जाता कामा नये, अशी सावधगिरी ‘मॉड्रेशन’च्यावेळी घ्यावी लागते. यादरम्यान प्रश्न बदलण्याचे अधिकारदेखील ‘मॉड्रेशन’ समितीला आहे. एकंदरीत ३५०० पेपर तयार करण्यात येत येणार आहे. १७ ते ३० मार्च यादरम्यान विषय प्राध्यापकांच्या प्रश्नावलींचे ‘मॉड्रेशन’ करण्यात येत आहे.
-------------------
परीक्षांपूर्वीचा महत्त्वाचा टप्पा हा विषय प्राध्यापकांच्या प्रश्नावलींचे ‘मॉड्रेशन’चा असतो. नियामनाचे कार्य सुरू झाले असून, दरदिवशी १८ ते २० बोर्ड समितीचे सदस्य ‘मॉड्रेशन’चे कर्तव्य बजावत आहे. त्यानंतरच पेपरची छपाई करण्यात येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ