अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी चांदूररेल्वे येथे भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आले असता त्यांचा घसा बसल्याने श्रोत्यांची निराशा झाली. मोदी यांचे ज्वाजल्य विचार ऐकण्यासाठी मतदारांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, मोदींनी घसा बसल्याने केवळ १३ मिनीटातच आपले भाषण आटोपते घेतले. त्यांच्या भाषणात फार दम नव्हता, असा सूरदेखील सभा आटोपताच मतदारांमधून ऐकावयास मिळाला.अमरावती, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चांदूररेल्वे येथील कुऱ्हा मार्गावर चांदुरवाडी परिसरात विस्तीर्ण जागेवर मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभास्थळी मोदींना घेऊन येणारे वायू दलाचे तीन हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सभेला मोदींचे हेलिकॉप्टर येताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी मोदी, मोदी जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. त्यानंतर हेलिपॅड ते सभास्थळ यादरम्यान मोदींना काळ्या रंगाच्या बुलेटपु्रफ वाहनातून आणले गेले. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी, ब्लॅक कंमाडो, पोलीस यंत्रणा तैनात होते. व्यासपीठाच्या मागील बाजूला नरेंद्र मोदी यांच्याकरिता ‘सेफ रुम’ तयार करण्यात आले होते. मोदी हे बुलेटपु्रफ वाहनातून उतरताच ‘सेफ रुम’मध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. मोदी व्यासपीठावर येताच श्रोत्यांनी जयघोषाने त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदींनी हात उंचावून मतदारांना साद घातली. दरम्यान अरुण अडसड यांनी नरेंद्र मोदी यांचे घोंगडी व ग्रामगीता देऊन स्वागत केले. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यातील भाजपच्या १८ उमेदवारांनी भलामोठा हार घालून मोंदीचा सत्कार केला. दुपारी १२ वाजताच्या सुमारास सभेला चिक्कार गर्दी झाली होती. काही तास वातावरण भाजपमय झाले होते. मोदींची ही सभा धामणगाव मतदारसंघात असल्यामुळे मोंदीच्या भाषणापूर्वी अरुण अडसड यांनी मनोगत व्यक्त करुन विदर्भातील प्रश्न, विकासाचा मुद्दा त्यांच्या पुढ्यात ठेवला. त्यानंतर खा. रामदास तडस यांनी आघाडी सरकारचा समाचार घेतला. यावेळी लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले. मात्र शर्मा यांच्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी भाषण करण्याचा निर्णय घेतला. मोदी हे जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यासाठी डायसवर आले. मात्र आवाजात बदल झाल्याचे जाणवताच उपस्थितांमधून ‘अरे यार’ असे शब्द आपसुकच बाहेर पडले. सतत सभांमध्ये भाषण करुन गळा खराब झाला, आवाज बसल्याचे मोदी म्हणाले. मोदींनी विदर्भातील संत्रा, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर हात घातला. शेतकरी आत्महत्या विषयावरही चिंतन केले. विकासाचा ‘फाईव्ह एफ फॉर्म्युला’ तसेच पाकिस्तानला सीमेवर भारतीय सैनिकांनी दिलेले गोळीबाराचे उत्तर, सीमेवरील नागरिकांच्या स्थानांतरणाची नुकसान भरपाई यावर ते बोलले. मोदींनी ११ मिनीट भाषण दिले, पण त्यात ‘तो’ जोश नव्हता. गर्दी पाहून ही गर्दी विजयाचे प्रतिक आहे, असे सांगायला ते विसरले नाहीत. सभास्थळी ये-जा करण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे वाहतूक व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा सांभाळताना पोलिसांची तारांबळ उडाली, हे विशेष.
मोदींचा बसला घसा
By admin | Published: October 11, 2014 1:03 AM