वनौषधींचा पोषण आहार : रोजगाराच्या संधीही निर्माण होणारधारणी : वनऔषधीकरिता प्रसिद्ध असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या ‘जंगलाचा मेवा’ मोहफूल रामबाण औषध असल्याचे मानले जाते. मोहफूल, गूड, शेंगदाणे व विलायची एकत्रित करून यापासून तयार करण्यात येणारे पावडर कुपोषितांच्या सकस आहारात वापरल्यास मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविला जाऊ शकतो. डोंगरदऱ्यात सापडणाऱ्या वनौषधीवर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी भागात महिला बचत गटांना रोजगाराची संधी म्हणून गृहउद्योग उभारायला हवेत. यात मोहफुलापासून निर्मित आहार तयार करण्यात यावा. हे पावडर इतर राज्यातील कुषोषित भागातही आहार म्हणून वापरता यावा, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. पुरातन काळापासून मोहफूल खाद्य हे आदिवासी कुटुंबांच्या आरोग्यासाठी फलदायी असून आजही शहरातील रहिवाशांपेक्षा आदिवासींना मधुमेह, किडनीचे आजार, लिव्हर असे मोठे आजार आजही आढळून येत नाही, यामागे मोहफूल व त्यापासून तयार झालेले पदार्थ मानले जाते. शहरी भागात मोहफुलाकडे दारू बनविण्याकडेच पाहिले जाते. मोहफुलापासून बनविलेल्या दारूपासून या भागात कोणतेही दुष्परिणाम झाले नाही. मोहफुलाचा अर्क काढून सेवन केले जाते. राज्यात मोहफुलापासून कोणतेही खाद्य किंवा मोहफुलाचा वापर मध काढण्यासाठी केला जात नाही. (तालुका प्रतिनिधी) उद्योग उभारणीची मागणीमणुका या फळापेक्षाही मोहफूल अधिक पौष्टिक असल्याचे आयुर्वेद जाणकार मानतात. लाखोळी, चारोळी, चरोटा, पळसाचे फूल, टेबरू, आवळा, बिहडा, औदुंबर अशी पौष्टीक फुले जंगलात आढळतात. यावर आधारित गृहउद्योग स्थापन करण्याची मागणी होत आहे. नागपूर येथील आयुर्वेदाचे अभ्यासक डॉ. शांतीलाल कोठारी यांनी पळसाच्या फुलापासून तयार केलेला चहा, चारोळ्यापासून कॉफी, मोहफुलाचा मुरब्बा व मोहफुलाचा मिश्र पोषण आहार तयार केला आहे. यापैकी मोहफुलाच्या पावडरचा वापर अंगनवाडी केंद्रातील मुलांना देण्याचे त्यांनी सरकारला सुचविले होते. याबाबतचे संशोधनही त्यांनी शासनासमोर ठेवले होते.
कुपोषणावर मोहफुलाचे पावडर रामबाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2017 12:11 AM