बेनोडा (शहीद): बेनोडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची आमदारांनी आश्वासनानुसार महिनाभरात दुरुस्ती प्रक्रिया न आरंभल्यास परिसरातील आदिवासी, शेतकरी व शेतमजुरांसोबत मोर्चा आमदारांच्या निवासस्थानी मोर्चाचा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष गोपाल नांदूरकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
बेनोडा जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक लढताना आमदार देवेंद्र भुयार यांनी सर्कलमधील नागझिरी, माणिकपूर, पळसोना, मांगोणा, धामणदस, जामगांव, खडका, तलोटी आदी गावातील नागरिकांना या गावांतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, झेडपी सदस्य म्हणून तीन वर्षांचा कालावधी लोटेपर्यंत कुठल्याही कामाला त्यांनी हात लावला नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर पुन्हा तीच आश्वासनांची खैरात त्यांनी वाटली. भोळ्या आदिवासी बांधवांनी भावनिक होऊन आमदारांना मतदान केले. मात्र, आमदारांनी या कामांबाबत कुठलीही हालचाल केली नसल्याने मतदारांत तीव्र नाराजी आहे. या गावांना जोडणारे सर्वच रस्ते अतिशय खस्ताहाल असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आश्वासित रस्त्यांच्या कामाला महिनाभरात सुरुवात न झाल्यास आमदारांच्या निवासस्थानी पायी मोर्चा घेऊन धडकणार असल्याचा इशारा बेनोडाचे उपसरपंच गोपाल नांदूरकर यांनी दिला आहे.
निवेदन देतांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शुभम शेरेकर, तालुका अध्यक्ष प्रा.मनोज गेडाम, कार्याध्यक्ष संदीप उईके, सचिव चंद्रकांत अडलक, प्रा. कमलनारायण उईके, संजय गोडबोले सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.