धारणी : तालुक्यातील माजी राज्यमंत्री यांचे गाव असलेल्या टेंबली येथील स्मशानभूमीचे ओटे अंतिम संस्कार करताना खचल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर अधिकारी टेंबली येथे पोहोचले. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर चुकीचे सर्वांना स्मरण झाले. त्या चुकीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा तरतूद करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
माजी राज्यमंत्री रामू ऊर्फ भाऊसाहेब पटेल यांच्या गावी टेंबली येथे काही महिन्यांपूर्वी स्मशानभूमी शेडचे निर्माण करण्यात आले. त्या शेडला कुंपण भिंतदेखील मंजूर करण्यात आली. मात्र, पावसाळ्यानंतर पहिल्याच अंतिम संस्काराच्या वेळी ओट्यावर लाकूड जमा करण्यासाठी चढलेल्या माजी सरपंचासह इतर व्यक्ती जखमी झाले होते. या प्रकारामुळे मेळघाटातील बांधकामाचे वास्तव परिस्थिती समोर आली आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ग्रामपंचायतीने १२ लाख रुपये खर्चून गावात स्मशानभूमीचे शेड आणि त्याला कुंपणभिंत अशी तरतूद केली. मात्र, स्मशानभूमीचे शेड चुकीच्या जागेवर बांधण्यात आल्यामुळे पहिल्याच पावसात स्मशानभूमीचा ओटा खचला.
‘लोकमत’ने याबाबत प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नाल्याच्या काठावर बांधण्यात आलेल्या शेडमध्ये संरक्षण भिंत आवश्यक असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. संरक्षण भिंतीकरिता जिल्हा परिषद सदस्याच्या निधीतून हे काम करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याचे उपअभियंत्यांनी सांगितले. मात्र, पूर्वी झालेला बारा लाखांचा खर्च आणि आणखी जवळपास दोन लाखांचा खर्च चुकीच्या नियोजनामुळे होणार असल्याचे चित्र आहे.
कारवाईकडे लक्ष
मेळघाटात बांधकाम करीत असताना, तांत्रिक अधिकारी आणि अभियंते कशाप्रकारे दुर्लक्ष करतात, याचा अनुभव टेंबली येथील स्मशानभूमी प्रकरणाने समोर आले आहे. याप्रकरणी जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई न झाल्यास चक्काजाम करण्याचा इशारा देणारे पत्र तक्रारकर्ते वीरेंद्र पाण्डेय यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिले. त्यामुळे याप्रकरणी चौकशीअंती कोणाला दोषी ठरविले जाते आणि कशाप्रकारे कारवाई होते, याकडे मेळघाटवासीयांचे लक्ष लागले आहे.
--------------------