नरेंद्र जावरे
अमरावती : समृद्ध महाराष्ट्राला गतिमान आणि समृद्ध करण्यासाठी नागपूर ते मुंबईपर्यंत बनविण्यात आलेला समृद्धी महामार्ग पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत सुरळीत सुरू झाला आहे. परंतु त्यावर मोकाट कुत्री, गुरांसह मॉर्निंग वॉक आणि रनिंग करणारे नागरिक असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नागपूर ते शिर्डीपर्यंत अलगद आणि सुखद प्रवास देणारा समृद्धी महामार्गअमरावतीवरून नांदगाव खंडेश्वर किंवा कारंजा येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करता येतो. सुसाट वेगाने धावणाऱ्या चारचाकी आणि मालवाहू ट्रक या मार्गाने धावताना दिसतात. शिस्तबद्ध पद्धतीने नियमांचे पालन करीत हा महामार्ग सुखकर आणि सुखद प्रवासासाठी तयार करण्यात आल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. समृद्धी महामार्गावर कारंजा येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जालना, औरंगाबाद दरम्यान मोकाट कुत्री, गुरे, भरधाव वाहनाच्या मधात जात असल्याने वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी अपघात झाल्याने मृत अवस्थेत पडलेल्या कुत्र्यांचे सांगाडेही दिसून आले.
महामार्गावर प्रतिबंध, पण तरीही...
समृद्धी महामार्ग दुचाकी, तीनचाकी ऑटो रिक्षा, पायदळ चालणारे मनुष्य मॉर्निंग वॉक आदी सर्वांसाठी हा मार्ग प्रतिबंधित असताना काही युवक याला रनिंग ट्रॅक समजण्याची चूक करताहेत, तर काही मॉर्निंग वॉकसाठी या महामार्गाचा वापर करीत आहेत.