मोर्शी : कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या विरोधात २० जुलै रोजी पुन्हा नगरसेवक हर्षल चौधरी यांनी विद्युत विभागाला ताला ठोकून नगरपरिषद प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला.
सात दिवसांपासून गजानन कॉलनी, आनंद नगर, यशवंत कॉलनी, मालवीय गार्डन येथील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत पडल्याने येथील नागरिकांना काळ्याकुट्ट अंधाराशी झुंज द्यावी लागत आहे. या कॉलनीत नोकरी व्यवसायातील लोकांची संख्या अधिक आहे. बाहेरगावी जॉबवर जाणारे लोक दुचाकी व चारचाकीने घरी येतात. तेव्हा पथदिवे बंद राहत असल्याने अंधारातून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या कॉलनी परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू शकते. याची दखल घेत प्रभागातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी नगर परिषदेकडे केल्या. मात्र अद्यापही लाईन सुरु झाली नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक हर्षल चौधरी यांनी लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये. यासाठी मंगळवारी नगरपरिषद कार्यालयातील विद्युत विभागाला ताला ठोकून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविला. पथदिवे सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा हर्षल चौधरी यांनी दिला. जुलै महिना संपत आला तरीही मोर्शी शहरात पाहिजे तसा पाऊस कोसळला नसल्याने उन्हाची दाहकता अजूनही कायम आहे. घरात प्रचंड उकाडा होत असल्याने वयोवृद्ध नागरिक बाहेर बसतात. लहान बालक बाहेर खेळतात. मात्र, अंधारामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढत आहे. मोर्शी शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने १९ जुलै रोजी थाळी बजाओ आंदोलनकरण्यात आले. मंगळवारी रोजी तालाठोको आंदोलनाची वेळ नगरसेवकांवर येऊन ठेपली. त्यामुळे मोर्शी नगर परिषदेला कोणी वाली आहे का? असा संतप्त सवाल मोर्शी शहरातील नागरिक करीत आहे.