कॉलनी परिसरातील एका कर्मचाऱ्याला ताप, सर्दी आणि काहीसा खोकल्याचा त्रास जाणवत होता. स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या प्रकृतीविषयी नेहमीच सतर्क असलेला हा कर्मचारी नियमित उपचार घेत होता. त्यांनी १५ मार्चला कोरोना तपासणीचा निर्णय घेऊन येथील शासकीय रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. तीन दिवसांत निकाल येणे अपेक्षित असताना तब्बल सहा दिवसांनी शनिवारी या कर्मचाऱ्याचा निकाल पॉझिटिव्ह असल्याचे कळविण्यात आले. यादरम्यान प्रकृतीत सुधार न झाल्याने ते घराबाहेर पडले नाही. मात्र, घरच्या मंडळीपासून त्यांनी स्वतःला विलग केले नव्हते. पर्यायाने घरची कुटुंबीय मंडळींची तपासणी आणि या कालावधीत त्यांना कोरोना संसर्गाची भीती या कर्मचाऱ्याने व्यक्त केली. कदाचित बरे वाटले असते, तर आपण कार्यालयात गेलो असतो. लोकांमध्ये मिसळलो असतो. पर्यायाने आपणामुळे रुग्ण वाढले असते, असे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल तीन दिवसांत देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. दिरंगाईमुळे संसर्ग पसरण्याची भीती आहे. रुग्णालय प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी केली.