सावकारी पाश : २ हजार ३५१ शेतकऱ्यांना लाभअमरावती : सुमारे ५ हजार ५२ शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून लाभ मिळाला आहे. यामध्ये २ हजार ३५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाख रुपये किमतीच्या वस्तू परत करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांत शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले आहे. कृषी उत्पादकांवर स्थिर किंवा घसरलेल्या किमती आणि शेतीचा वाढलेला खर्च या दृष्टकाळात शेतकरी अडकले. मान्सूनची अनियमितता किंवा नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या संकटात अधिक भर टाकली. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आणि आत्महत्येच्या घटना घडू लागल्या. २०१४ मध्ये पावसाच्या अनियमिततेने खरीप पिकांचे नुकसान झाले. सोबतच रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. मागील वर्षी २०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते. परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली. पण अवैध सावकारीचा पाश कायम आहे. जिल्ह्यात एकूण ४४७ परवानाधारक सावकार आहेत. ३० नाव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत कर्जदारांना १०१ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. राज्य शासनाने १० एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला होता. आॅक्टोबर अखेर ५ हजार ५२ कर्जदारांना ११ कोटी ४२ लाख रुपये सावकारी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली. त्यापैकी २ हजार ५५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८ लाखांच्या किमती वस्तू परत करण्यात आल्या आणि त्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात २०१४-१५ या वर्षात १ हजार ६२२ कोटींचे खरीप कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख २१ हजार शेतकऱ्यांना १ हजार २१९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
चार कोटी आठ लाख रुपयांच्या गहाण वस्तू शेतकऱ्यांना परत
By admin | Published: November 11, 2015 12:19 AM