खरीप २०१५ मधील कपाशी, सोयाबीनचे नुकसान : सर्व तालुक्यांना निधी वाटपअमरावती : अत्यल्प पावसामुळे खरीप २०१५ हंगामातील सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी जिल्हा प्रशासनाला १०९ कोटी ३६ लाखांचा निधी गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित करण्यात आला. यात सर्वाधिक १७ कोटी ५४ लाखांची मदत नांदगाव खंडेश्वर तालुक्याला देण्यात येणार आहे.खरीप २०१५ मधील पिकांचे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झाले होते व जिल्ह्याची पैसेवारी ४३ पैसे होती व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासाठी शासनाने एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत न करता पीक विमा मंजूर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतीचा निर्णय २ मार्च २०१५ ला घेतला. मात्र २०१७ चा खरीप हंगाम संपूनही मदत मिळाली नाही. आता हा निधी गुरूवारी सर्व तहसीलदारांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित केला आहे. २९ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून हा निधी वाटपाची कार्यवाही करण्यात येणार आहे. ही मदत शेतकऱ्यांना रोखीने न देता थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे व ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्या शेतकऱ्यांचे जनधन योजनेखाली झीरो बॅलेन्स खाते उघडून त्या खात्यामध्ये ही मदत जमा करण्यात येणार आहे व मदतीमधून कोणतीही शासकीय थकीत वसुली करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. निधी वाटपासाठी शेतकऱ्यांचे वेगवेगळे धनादेश न काढता बँकनिहाय व गावनिहाय शेतकऱ्यांकरिता एकत्रित रकमेचा धनादेश बँकेत जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)- तर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईशेतकऱ्यांच्या मदतीचा निधी कोषागारातून आहरीत करून तो बँकेमध्ये पडून राहिल्यास हा तात्पुरता अपहार समजून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. मदत वाटपाचा आढावा घेण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. बीडीओ उपाध्यक्ष व नायब तहसीलदार हे समितीचे सचिव राहणार आहेत.
नांदगाव तालुक्याला सर्वाधिक मदत
By admin | Published: January 21, 2017 12:11 AM